रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या वाहतुक पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार जुहू-वर्सोव लिंक रोड येथे घडला. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अजय कोर्लेकर(५६) हे डीएन नगर वाहतुक विभागात कार्यरत आहेत. हेही वाचा >>> मुंबई: पालिका अधिकाऱ्याला शिवसेनेच्या शाखा प्रमुखाकडून मारहाण मुंबई पोलिसांच्या नियत्रंण कक्षाकडे जुहू-वर्सोवा रस्त्यावर वाहने उभी करण्यात आल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यावेळी कोर्लेकर व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. त्यांनी तेथील उभ्या गाड्यांचे छायाचित्र काढण्यास सुरूवात केली असता तीन व्यक्ती तेथे आल्या व त्यांनी कोर्लेकर यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यातील एकाने कोर्लेकर यांच्या कानाखाली मारले. त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याच्यासह असलेल्या दोन व्यक्तींनी कोर्लेकर यांचे हात पकडले व आरोपी पळून गेला. त्यानंतर आरोपीचे साथीदारही पळून गेले. या घटनेनंतर कोर्लेकर यांनी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार वर्सोवा पोलिसांनी शनिवारी तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.