मुंबई : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण थांबवून त्यांची मसुरीच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन संस्थेत रवानगी करण्यात येणार आहे. मसुरी केंद्राने प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केल्यानंतर राज्य त्यांना तातडीने पदमुक्त केले आहे.

चुकीच्या मार्गाने आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळविल्याचा खेडकरांवर आरोप आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कागदपत्रांची फेरतपासणी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली असतानाच मसुरीच्या संस्थेनेही राज्य सरकारकडून अहवाल मागविला होता.

हेही वाचा >>>कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; प्रवेशाची पहिली यादी ४ ऑगस्ट रोजी

हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन संस्थेने खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. संस्थेचे पत्र प्राप्त होताच शासनाने प्रशिक्षण स्थगित करून त्यांना कार्यक्रमातून मुक्त केले. तसेच २३ जुलैपर्यंत मसुरीच्या प्रशासन संस्थेत हजर होण्याचा आदेशही शासनाने खेडकर यांना दिला आहे.

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून राज्य सरकारने त्यांचे प्रशिक्षण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजमाध्यमांतील चर्चांवर केंद्राची नजर

खेडकर यांच्यावरील आरोपांनंतर समाजमाध्यमांवर अन्य संभाव्य प्रकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. खेडकरांप्रमाणेच किमान डझनभर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातील अनेकांची निम्मी कारकीर्दही पूर्ण झाली आहे. समाजमाध्यमांतील या चर्चांवर केंद्र सरकारचे लक्ष असून या प्रकरणी अधिकृत तक्रार आल्यास तपशील तपासून योग्य चौकशी केली जाईल, असे केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.