मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरातील हजारो स्वयंरोजगार चालकांच्या हिताच्या विरोधात काम केल्याचा आरोप महाराष्ट्र कामगार सभेद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे ते कॅब व रिक्षा चालकांच्या मुळावर उठले आहेत, अशा परखड शब्दात ॲप-आधारित कॅब आणि रिक्षा चालकांनी प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली आहे. तसेच येत्या काही दिवसांत त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कामगार सभेद्वारे दिला आहे.
नेमके प्रकरण काय ?
ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांनी भरमसाठ नफा कमवून प्रवासी व चालकांना वेठीस धरले. या खासगी कंपन्यांच्या जोखंडातून मुक्त करण्याच्या हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी ॲप बस, रिक्षा, टॅक्सी व ई-बस या वाहन सेवेकरिता राज्य सरकारने ॲप तयार करण्याचे सुनिश्चित केले. हे ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येणार आहे. या परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेबाबत चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्र कामगार सभेचे म्हणणे काय ?
ओला, उबर, रॅपिडोसारख्या कंपन्या अफाट परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून राज्यातील रिक्षा व कॅब चालवणाऱ्या युवकांचे शोषण करत असून त्याविरोधात आंदोलन छेडले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले. या विषयावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री यांनी गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. परंतु, या बैठकीत कॅब व रिक्षा चालकांचा तोडगा काढण्याऐवजी एक नवीन ॲप परदेशी खासगी संस्थांच्या माध्यमातून चालू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला फक्त विजेवर चालणारी बाइक टॅक्सी चालवण्याचे धोरण होते. परंतु, आता पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक टॅक्सी सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी गुरुवारी मंत्रीमंडळ बैठकीनंतर सांगितले, असे म्हणणे महाराष्ट्र कामगार सभेद्वारे मांडण्यात आले.
महाराष्ट्र कामगार सभेची भूमिका काय?
देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी अनेक वेळा ओला, उबरसारख्या ॲपमुळे कॅब व रिक्षा चालकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी चालक सहकारी संस्थांच्या माध्यमातून ॲप चालवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, तसेच सरकार स्वतः असे कोणतेही ॲप बनवू शकत नाही असे वेळोवेळी निर्देश दिले आहेत. परंतु, महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा खासगी ॲपच्या माध्यमातून या व्यवसायात पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व गोष्टींमुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध करत असून लवकरच पुन्हा तीव्र आंदोलन संघटनेच्या वतीने छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष डॉ. केशव बाना क्षीरसागर यांनी दिला. तसेच मुंबै बँकेच्या माध्यमातून नवीन पाच हजार वाहने रस्त्यावर आणण्याचा मानस असल्याचे बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे सध्याच्या रिक्षा, टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी परिवहन मंत्री ॲप काढण्यात व्यस्त आहेत.