मुंबई : मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेसाठी उत्तन येथील डोंगरीत कारशेड बांधणार आहे. या कारशेडसाठी डोंगरीतील १२ हजारांहून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे. मात्र पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास न करताच वृक्षतोड केली जात असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. मेट्रो प्रकल्पांसाठी पर्यावरणासंबंधी परवानगीची आवश्यकता नाही.
मात्र प्रकल्पाच्या कामाचा पर्यावरणाच्या अनुषंगाने काय परिणाम होणार हे तपासून आवश्यक ती उपाययोजना करून प्रकल्प राबविण्यासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास अहवाल आवश्यक आहे. असे असताना डोंगरी कारशेडसाठी असा अभ्यास न करताच वृक्षतोड केली जात असून ही वृक्षतोड बेकायदा असल्याचा आरोप करीत वृक्षतोड तात्काळ थांबविण्याची, तसेच कारशेड इतरत्र हलविण्याची मागणी होत आहे. एमएमआरडीएने दहिसर ते मिरा-भाईंदर दरम्यान १३.६ किमी लांबीच्या मार्गिकेचे काम सुरू केले आहे.
या मार्गिकेतील दहिसर – काशीगाव या ४.५ किमीच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या सुरू असून डिसेंबरपर्यंत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या मार्गिकेतील डोंगरी येथील कारशेडच्या कामासाठी वृक्षतोडीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र स्थानिक, पर्यावरणप्रेमींचा त्याला विरोध आहे. मिरा-भाईंदर शहराचा हा एकमेव प्राणवायूचा स्त्रोत आहे, त्यामुळे हा स्त्रोत कायम ठेवावा अशी मागणी आहे. या मागणीसाठी जनआंदोलनही उभारण्यात आले आहे. मात्र स्थानिकांच्या या मागणीकडे कानाडोळा करीत कारशेडच्या कामासाठी वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली आहे.
कारशेडच्या कामासाठी १२ हजारांहून अधिक झाडे कापली जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे. दरम्यान, एमएमआरडीएने डोंगरी कारशेड प्रकल्पासाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास केला नसल्याने हे काम बेकायेदशीर असल्याचा आरोप सातत्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांकडून केला जात होता. आता माहिती अधिकाराखाली पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास अहवाल तयार करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.
ॲड. गाॅडफ्रे पिमेंटा यांनी डोंगरी कारशेडसाठी पर्यारवणीय प्रवाभ मूल्यांकन अहवालाची प्रत माहिती अधिकाराखाली मागितली होती. मात्र अशी प्रत उपलब्ध नसल्याचे एमएमआरडीएने माहिती अधिकाराच्या उत्तरात नमुद केले आहे. त्यामुळे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास न करता वृक्षतोड कशी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करीत एमएमआरडीएचे काम बेकायदा असल्याचा आरोप गाॅडफ्रे पिमेंटा यांनी केला आहे.
याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता मेट्रो प्रकल्प नागरी सुविधा प्रकल्प म्हणून घोषित असून या प्रकल्पासाठी पर्यावरण परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात आले. एमएमआरडीएच्या या स्पष्टीकरणावर गाॅडफ्रे यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. पर्यावरणासंबंधीची परवानगी घेणे आवश्यक नाही हे अगदी खरे आहे. पण प्रकल्पाचा पर्यावरणीय परिणाम काय होणार हे तपासणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेऊन प्रकल्प राबवविता येईल.
त्यात डोंगरी कारशेडचा परिसर नैसर्गिक डोंगर, झाडे-झुडपे, वनस्पती, फळझाडे, विविध वन्यजीव, पक्षी, कीटक, नैसर्गिक पाणी स्त्रोतांचा परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास होणे आवश्यक असल्याची माहिती मिरा-भाईंदरमधील एका पर्यावरणप्रेमीने दिली. त्याचवेळी मेट्रो ९ मार्गिकेतील रद्द करण्यात आलेल्या राई, मुर्धा, मोर्वा कारशेडसाठी एमएमआरडीएने असा अहवाल तयार केला होता. मेट्रो १, मेट्रो ३ आणि अन्य प्रकल्पासाठीही असा अहवाल तयार करून प्रकल्प राबविण्यात आला होता.
मग डोंगरीसाठी का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत गाॅडफ्रे यांनी याबाबत आपण केंद्रीय पर्यावरण मंत्रायलायकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, असा अभ्यास सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. मात्र वृक्षतोड सुरू झाल्यानंतर अभ्यास कसा केला जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.