मुंबई : मलनिस्सारण प्रकल्पाच्या वांद्रे येथील केंद्राच्या बांधकामात अडसर ठरणारी ५४२ झाडे धोक्यात आली आहेत. त्यापैकी १८९ झाडे कापावी लागणार असून ३५३ झाडे पुनरेपित करावी लागणार आहेत. यापूर्वीही या कामासाठी ५४७ झाडे कापण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, ही झाडे वाचवता येतील का याचा अभ्यास करण्यासाठी हा प्रस्ताव थांबवण्यात आला होता. आता नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेने मलनिस्सारण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. यापैकी वांद्रे येथील केंद्राच्या जागी ७२० झाडे आहेत. त्यापैकी आधी ५४७ झाडे हटवावी लागणार होती. म्हणजेच २०४ झाडे कापावी लागणार होती आणि ३४३ झाडे पुनरेपित करावी लागणार होती. तसा प्रस्ताव कंत्राटदार कंपनीने मे २०२३ मध्ये महिन्यात वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. याबाबत जाहिरातही देण्यात आली होती. मात्र, पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्यानंतर जास्तीत जास्त झाडे वाचवता येतील का या दृष्टीने प्रशासनाने या प्रकल्पाच्या आराखडय़ाचा पुन्हा आढावा घेण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे कंत्राटदार कंपनीने नव्याने वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला. नव्या प्रस्तावानुसार ५४२ झाडे हटवावी लागणार आहेत. त्यापैकी १८९ झाडे कापावी लागणार असून ३५३ झाडे पुनरेपित करावी लागणार आहेत. त्यामुळे आता वृक्ष प्राधिकरण यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>>पनवेल पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करातून २०० कोटी जमा
मुंबई मलनिस्सारण प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडला होता. जागेची कमतरता, पर्यावरणविषयक मंजुरी, प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेवरील कांदळवने, वेळोवेळी बदलणारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची मानके यामुळे हा प्रकल्प गेली दहा वर्षे रखडला होता.
प्रतिदिन ३६० दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया
सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर एकूण २,४६४ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेने मलजलावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर शक्य होणार आहे. त्यासोबतच पर्यावरणाचा ऱ्हास देखील टाळला जाणार आहे. वांद्रे येथील केंद्रात प्रतिदिन ३६० दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया करता येणार आहेत.