लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेलच्या ताफ्यात पहिली स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी दाखल झाली आहे. या गाडीची जोडणी करून तिच्या चाचणीला आता सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर ही चाचणी चालणार असून त्यानंतर म्हणजेच जूनच्या मध्यावर ही गाडी सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून या प्रकल्पास तोट्यातून बाहेर काढण्यासाठी, मोनोरेलची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मोनोरेलच्या ताफ्यात १० नवीन मोनोरेल गाड्या दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. भारतातच या गाड्यांची बांधणी करण्याचे निश्चित करून एमएमआरडीएने गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट मेधा सर्वो ड्राइव्हज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. या कंत्राटानुसार ही कंपनी १० मोनो गाड्यांची बांधणी करीत असून यासाठी ५९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी पहिली गाडी तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे.

आणखी वाचा-“हिजाब घातल्यावर नोकरी कोण देईल?”, मुंबईतील महाविद्यालय हिजाब बंदीवर ठाम!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडाळा कारडेपोत या गाडीची जोडणी करण्यात आली असून गेल्या आठवड्यापासून या गाडीच्या चचणीस सुरुवात करण्यात आली आहे. ही चाचणी रात्री करण्यात येत आहे. स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी रात्री धावत आहे. दरम्यान, महिनाभर ही चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ही गाडी सेवेत रुजू होणार आहे. उर्वरित नऊ गाड्या टप्प्याटप्प्याने डिसेंबरपर्यंत सेवेत दाखल होणार आहेत. या सर्व दहाही गाड्या सेवेत दाखल झाल्यास आजघडीला प्रत्येक १५ ते ३० मिनिटांनी सुटणारी मोनोरेल दर सहा मिनिटांनी सुटणार आहे. यामुळे प्रवासी संख्या आणि महसूल वाढेल, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त केला जात आहे.