वाहनांची संख्या कमी असल्यामुळे वाहतुकीच्या दरांत वाढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमर सदाशिव शैला, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेले ट्रक, चालक-वाहक आणि टाळेबंदीमुळे वाहतुकीवर आलेल्या मर्यादा यांमुळे मालवाहतुकीच्या दरांत कमालीची वाढ झाली आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता अन्य उद्योगधंद्यांवर आलेल्या निर्बंधांमुळे बहुतांश माल वाहतूकदारांनी ४० ते ५० टक्के दरवाढ केली आहे. तर गाडय़ांचा तुटवडा असलेल्या ठिकाणी ही भाववाढ जवळपास ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होण्यात झाला आहे.

टाळेबंदीतही जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. मात्र बहुतांश उद्योगधंदे बंद आहेत. याचा परिणाम मालवाहतुकीच्या दरात वाढ होण्यात झाला आहे. मालवाहतूक दुहेरी चालते. म्हणजे मूळ माल पोहोचविल्यानंतर परतीच्या प्रवासातही मालवाहतूक करणे. मात्र सध्या सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी माल मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. दूरवर प्रवास करणाऱ्या बहुतांश गाडय़ा माल इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर रिकाम्या येत आहेत. परिणामी वाहतूकदारांकडून एकाच वेळी दोन्ही बाजूंचे भाडे वसूल केले जाते. त्यामुळे मालवाहतुकीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

अमोल शिंदे टाळेबंदी लागण्यापूर्वी सातारा ते मुंबई या दरम्यानच्या १० टन मालाची वाहतूक करण्यासाठी ९ ते १० हजार रुपये भाडे आकारत. मात्र सद्य:स्थितीत सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने मुंबईत माल घेऊन आल्यावर रिकामे परतावे लागते. त्यामुळे त्यांना भाडेवाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही. सद्य:स्थितीत मुंबई ते सातारा या मालवाहतुकीसाठी सुमारे १७ हजार रुपये भाडे आकारत आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

नवी मुंबईतील बाजारातून वरळी आणि दक्षिण मुंबईतील विविध भागांत साखरेची वाहतूक करण्यासाठी चालकांकडून ५० किलोच्या पोत्यामागे ५० रुपये भाडे आकारले जात असे. आता त्यात वाढ होऊन प्रति पोते आता ७० ते ८० रुपये भाडे घेतले जाते. याला वाहतुकीच्या दरातील वाढीबरोबर मजुरी खर्चातील वाढ कारणीभूत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. मुंबई ते दिल्ली वाहतुकीसाठी २५ टन गाडीला अंदाजे ७५ हजार रुपये भाडे याआधी आकारले जात. सध्या त्यात ९५ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या २५ टक्केच वाहतूक सुरू आहे. इतर गाडय़ांच्या दुरुस्तीचे काम प्रलंबित असल्याने त्या रस्त्यावर येऊ शकत नाहीत. तसेच कामगारांची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे भाडेवाढ झाल्याची माहिती मालक सुरेश खोसला यांनी दिली. मजुरांअभावी गाडय़ा रिकाम्या करण्यासाठीही अधिक वेळ लागतो. ‘मुंबईतून दोन ट्रक भरून पशुखाद्य वलसाड येथे पाठविले होते. माल उतरविण्यासाठी मजूरच नसल्याने तीन-चार दिवस गाडय़ा उभ्या राहिल्या. त्याचबरोबर परतीचे भाडे मिळाले नाही. बहुतांश वाहने बंद असली तरी चालकांना उपजीविकेसाठी पगार द्यावाच लागतो,’ असे बॉम्बे गुड्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक राजगुरू यांनी सांगितले.

परतीचे भाडे नाही

परतीचे भाडे मिळत नाही. त्यामुळे वाहतूकदारांच्या खर्चात वाढ झाल्याने भाडेवाढ केली जात आहे. सध्या वाहतूकदरात ४० ते ५० टक्के भाडेवाढ झाली आहे, अशी माहिती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे समिती अध्यक्ष बल मिल्कीत सिंग यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck operators increased rates for transport goods during lockdown zws
First published on: 23-04-2020 at 02:54 IST