मुंबई : आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जनजागृतीसाठी घरोघरी आरोग्य तपासणी करुन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. ही मोहीम ६ डिसेंबरपर्यंत राबवली जाणार आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार मुंबईला सन २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मुंबईत २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत संयुक्त क्षयरोग शोध मोहीम आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे.




हेही वाचा – मुंबई : आत्महत्या करत असल्याचे छायाचित्र पाठवून पोलिसाची आत्महत्या
घरोघरी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. तसेच क्षयरोग व कुष्ठरोग बरा होतो. त्यामुळे लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता रुग्णांनी महानगरपालिका, शासकीय रुग्णालयाशी लवकरात लवकर संपर्क साधावा व उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या मोहिमेदरम्यान नव्याने आढळणाऱ्या कुष्ठ व क्षयरुग्णांची नोंदणी केली जाईल. तसेच या रुग्णांना महानगरपालिकेचे नजीकचे आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल. त्यानंतर पुढील आरोग्य तपासणी आणि उपचार विनामूल्य दिले जातील. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे मुंबईतील सर्व २४ विभागांतील २८ वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत यंत्रांद्वारे क्षयरुग्णांकरीता विविध निदान सेवा पुरविण्यात येत आहेत. मुंबईतील क्षयरुग्णांना सेवा देण्याकरीता २११ आरोग्य केंद्रे आणि १८६ महानगरपालिका दवाखाने, १६ सर्वसाधारण रुग्णालये, ५ वैद्यकीय महाविद्यालये आणि २०० आपला दवाखाना मुंबईत कार्यरत आहेत. बहुआयामी प्रतिरोध (मल्टी ड्रग रेझिस्टंट) क्षयरोग रुग्णांसाठी संपूर्ण मुंबईत २७ डीआर टीबी उपचार केंद्रे कार्यरत आहेत. त्यातील ७ डीआर टीबी उपचार केंद्रे ही खासगी आहेत. सर्व क्षयरुग्णांना पौष्टिक आहार सहाय्यासाठी उपचारादरम्यान रुपये ५०० दरमहा त्यांच्या बँक खात्यात केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत जमा केले जातात, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.
दहा लाख घरांमधील ४९ लाख नागरिकांची तपासणी…
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान १० लाख ८८ हजार घरांमधील अंदाजे ४९ लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक महिला आरोग्य स्वयंसेविका आणि एक स्वयंसेवक यांचा एक गट अशा ३ हजार ११७ गटांद्वारे तपासणी केली जाणार आहे.
क्षयरोगाची लक्षणे –
१४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, सायंकाळी ताप येणे, लक्षणीय वजन कमी होणे, कफात रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे
कुष्ठरोगाची लक्षणे :
रुग्णांच्या त्वचेवर फिकट, लालसर बधीर चट्टा, चट्टे येणे. जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, तसेच तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.
कुष्ठरोगाचे असांसर्गिक कुष्ठरोग व सांसर्गिक कुष्ठरोग असे दोन प्रकार आहेत. बहुविध औषध उपचार पद्धतीने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगाच्या प्रकाराप्रमाणे एम. डी. टी. चे औषध असांसर्गिक रुग्णास ६ महिने व सांसर्गिक रुग्णास १ वर्ष एवढ्या कालावधीसाठी देण्यात येते. बहुविध औषध उपचाराची पाकिटे महानगरपालिकेचे सर्व आरोग्य केंद्र, दवाखाने तसेच अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.