Mumbai Navy Gun Theft case : कुलाबा नेव्ही नगर या अतिसुरक्षित परिसरातून इंसास रायफल, तीन भरलेल्या मॅगझीन व ४० काडतुसांची चोरी करणाऱ्या दोघांना तेलंगणा राज्यातील नक्षलग्रस्त परिसरातून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपी सख्खे भाऊ असून दोघांनी चोरलेली रायफल आणि काडतुस जप्त करण्यात आली आहेत.

अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी केरळ येथील कोची नौदलात यापूर्वी कार्यरत होता. त्यानंतर त्याने काही महिने मुंबईतही काम केले होते. अटक करण्यात आलेले दोघे चोरलेली इंसास रायफल नक्षलवाद्यांना विकण्याच्या तयारीत होते का, याबाबत पोलीस अधिक तपास करण्यात येत आहे.

राकेश डुबाला आणि उमेश डुबाला या दोन आरोपींना तेलंगणा येथील असिफा जिल्ह्यातील येळगापल्ली गावातून अटक करण्यात आल्याचे उपायुक्त (गुन्हे) राज तिलक रौशन यांनी सांगितले. दोघेही तेथील रहिवासी असून तेथे शिधावाटप दुकान चालवतात. राकेशचे १२ वीपर्यंत, तर उमेशचे १० वीपर्यंत शिक्षण झाले आहे. ते दोघे ४ सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झाले होते, दोन दिवस त्यांनी मुंबईतील कुलाबा येथील नोदलाच्या आतील परिसराची रेकी केली.

दोघांपैकी राकेश कोची येथे नौदलात कार्यरत होता. त्यानंतर काही दिवस तो मुंबईत कार्यरत होता. राकेश बंदोबस्ताला तैनात असलेल्या नाविकांची डांगरी घालून ६ सप्टेंबर रोजी नेव्ही नगरमध्ये गेला होता, सायंकाळी ७.३० वाजता तो एपी टॉवर्स या प्रतिबंधित परिसरात गेला होता. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका जवानाला अतिदक्षतेचा इशारा असल्याचे त्याने सांगितले.

बंदोबस्ताला तैनात व्यक्ती बदलण्याच्या सूचना आहेत. यापुढे मी या ठिकाणी बंदोबस्ताला तैनात असेन, असे सांगून त्याने तेथे कार्यरत असलेल्या जवानाकडील इंसास रायफल, ३ मॅगझीन आणि ४० जिवंत काडतुसे घेतली व त्या जवानाला वसतिगृहात जाण्यास सांगितले. तेथे तैनात जवानाला खरे वाटल्यामुळे तो तेथून निघून गेला. त्यावेळी राकेशचा भाऊ उमेश नेव्ही नगरच्या बाहेर उभा होता. राकेशने भींतीवरून रायफल व काडतुसे असलेली बॅग फेकली. ती घेऊन उमेश निघून गेला. त्यानंतर राकेशही तेथून पळून गेला.

पूर्वी तेथे तैनात असलेला जवान आपले घड्याळ विसरून गेला होता. घड्याळ घेण्यासाठी अर्ध्या तासाने तो तेथे आला. परंतु तेथे राकेश नसल्याचे त्याला आढळले, त्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण गंभीर असल्यामुळे मुंबई गुन्हे शाखा, दहतवाद विरोधी पथक, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि नौदल पोलीस आरोपीचा शोध घेत होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने नऊ पथके तयार केली होती.

तपास यंत्रणांच्या हाती काही पुरावे लागल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथक तात्काळ आरोपीचा माग काढत तेलंगणामध्ये दाखल झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणातील नक्षली भागातून मंगळवारी रात्री राकेश आणि उमेश या दोघांना अटक करून त्यानी चोरलेली इंसास रायफल आणि भरलेल्या मॅगझीन जप्त केले.

रायफल घेऊन रेल्वेतून प्रवास

नेव्ही नगर येथून रायफल चोरी केल्यानंतर दोघेही लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचले. तेथून ते पुण्याला गेले. नंतर दोघेही रेल्वेने हैदराबादला गेले. तेथून त्यांनी स्वतःचे येळगापल्ली गाव गाठले. या प्रवासादरम्यान ती रायफल त्यांच्यासोबत होती. दरम्यान, याप्रकरणी भारतीय शस्त्रात्र प्रतिबंधक कायद्याचे कलम वाढवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.