मुंबई : एका व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी त्याच्या पत्नीकडे ५० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेतील (डीआरआय) दोन अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर वरिष्ठ गुप्तचर अधिकारी दीपक कुमार आणि निरीक्षक चेतन पारिख या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

तक्रारदार शैलेश व्यास हे बर्ना इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत. सप्टेंबर महिन्यात ते कामानिमित्ताने दुबईला गेले होते. ३० सप्टेंबर रोजी ते भारतात परतले. कोलकाता विमानतळावर त्यांना केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेचे (डीआरआय) अधिकारी दीपक कुमार आणि चेतन पारिखे यांनी ताब्यात घेतले. परदेशातून बेकादेशीररित्या किटकनाशक आयात करून आयात शुल्क चुकवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. त्यांची १० तास चौकशी करण्यात आली.

व्यावसायिकाच्या पत्नीकडे ५० लाखांची मागणी

या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी व्यावसायिक शैलेश व्यास यांची पत्नी प्रतिभा व्यास यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. मध्यस्थ सुरेश नंदा याने पैशांसाठी पाठपुरावा सुरू केला होता. याबाबत पत्नी प्रतिभा यांनी डीआरआयच्या आयुक्तांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. शैलेश व्यास यांच्या विरोधात कोणतीही लूक आऊट नोटिस किंवा समन्स कोणत्याही तपास यंत्रणेने जारी केलेले नव्हते. तरी त्यांना ताब्यात घेऊन पैशांची मागणी केल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. आयुक्तांनी या आरोपांची पडताळणी केल्यानंतर बुधवारी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले.