मुंबई- पुण्यातील प्रसिध्द सराफ दुकानाच्या नावाने मुंबईतील सोन्याचे दागिने घडवणाऱ्या दोन कंपन्यांची ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमएआयडीसी पोलिसांनी कार्तिक शाह नावाच्या आरोपीला अटक केली आहे. शाह याने नामांकित सराफ दुकानाचे जीएसटीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्याचा गैरवापर करून फसवणूक केली.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक शाह (३३) हा आरोपी बोरीवलीत राहतो. त्याने काही वर्षं सराफाच्या दुकानात काम केलेले आहे. त्यामुळे त्याला या व्यवसायातील बारकावे आणि सखोल माहिती आहे. या माहितीच्या आधारे त्याने फसवणूक करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली.

दिशाभूल करून जीएसटी प्रमाणपत्र मिळवले.

कार्तिक शाह ८ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका प्रसिद्ध सोने-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात गेला. मी आंतराष्ट्रीय हिरे परिक्षण संस्थेचा (इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट) अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने व्यवस्थापकाकडे त्याने वस्तू सेवा कर (जीएसटी) प्रमाणपत्र अद्ययावत करण्याच्या बहाण्याने प्रमाणपत्राची प्रत मागितली. त्याच्या देहबोलीवरून कुणाला संशय आला नाही. त्यामुळे त्याला व्यवस्थापकाने जीएसटी प्रमाणपत्राची प्रत दिली.

दोन कंपन्यांची फसणूक

संबंधित दुकानाचे जीएसटी प्रमाणपत्र हाती आल्याने शाह याने पुढची खेळी केली. या प्रमाणपत्राचा वापर त्याने फसवणुकीसाठी केला. दुसऱ्याच दिवशी ९ ऑगस्ट रोजी शाहने मुंबईतील ‘मनी ज्वेल्स एक्स्पर्ट विथ बेटर डायमंड’ आणि ‘कॅलिस्टा ज्वेलर्स’ या सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला. संबंधित दुकानाचे नाव वापरून दोन नवी शोरूम उघडत असून तेथे ठेवण्यासाठी दागिने लागणार असल्याचे सांगितले. कंपन्यांचा विश्वास बसावा यासाठी जीएसटी प्रमाणपत्राची प्रत पाठवली. त्यामुळे कंपनीचा विश्वास बसला. त्याने कंपन्यांना दागिने पार्सल पोर्टरमार्फत पाठविण्यास सांगितले आणि मुंबई व पुण्यातील वेगवेगळे पत्ते सांगितले. मात्र पोर्टर शोरूमच्या पत्त्यावर पोहोचण्यापूर्वीच शाहने बांद्रा येथे रस्त्यात गाठून त्याच्याकडून पार्सल घेतले.

अशा प्रकारे शाहने दोन्ही कंपन्यांकडून ३१ लाख ५८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने लंपास केले. आपण पाठवलेले दागिने संबंधित दुकांनात पोहोचले नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूकीचा हा प्रकार उघड झाल्याचे समजले. या प्रकऱणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांनी तपास करून मुंबईतील कार्तिक शाह याला अटक केली आहे.

आरोपीने वापरलेला मोबाईल नंबर शोधून काढला. त्याचबरोबर पोर्टर कंपनीकडून मिळालेल्या माहितीद्वारे कार्तिक शाहचा शोध घेऊन अटक केली, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांनी दिली. आरोपीने आणखी किती कंपन्यांना फसवले आहे, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.