मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंच मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे माघी गणेशोत्सवातील पश्चिम उपनगरातील दोन मूर्तींचे अखेर विसर्जन करता येणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले विसर्जन अखेर २ ऑगस्टला एकत्रित होणार आहे.

माघी गणेशोत्सवाला तब्बल सहा महिने झाले, तरी पश्चिम उपनगरातील दोन मंडळांच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. डहाणूकरवाडी येथील कांदिवलीचा श्री आणि कांदिवलीतील चारकोपचा राजा या दोन मंडळांच्या पीओपीच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. या दोन मंडळांनी कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास नकार दिला होता. त्यामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन अद्याप होऊ शकले नव्हते.

माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. त्यामुळे माघी उत्सवातील अनेक गणेशमूर्तीचे विसर्जन रखडले होते. अनेक सर्वजनिक मंडळाच्या मूर्ती मिरवणुका मार्वे समुद्र किनाऱ्यावरून परत पाठवल्या होत्या.

या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने जास्तीत जास्त खोल असे कृत्रिम तलाव तयार केले होते. त्यात अनेक मंडळानी आपल्या गणेश्मूर्तीचे विसर्जन केले. मात्र मूर्तींची उंची जास्त असल्यामुळे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास या दोन मंडळांनी नकार दिला होता. कांदिवलीचा श्री मंडळाने आपली मूर्ती मंडपालगतच्या मैदानात झाकून ठेवली आहे, तर चारकोपचा राजा या मंडळाने मूर्ती अज्ञातस्थळी झाकून ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नी तोडगा निघेल या आशेवर या दोन मंडळांचे पदाधिकारी राज्य सरकारकडे व न्यायालयीन सुनावणीकडे डोळे लावून बसले होते.

दरम्यान, गुरुवारी २४ जुलै रोजी उच्च न्यायालयाने सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेशमूर्तीचे विसर्जन समुद्रात व नैसर्गिक जलप्रवाहात करण्यास परवानगी दिल्यामुळे या दोन मंडळाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या दोन्ही मंडळानी २ ऑगस्ट रोजी मालाड मार्वे समुद्रकिनारी मूर्तीचे एकत्रित विसर्जन करण्याचे ठरवले असल्याची माहिती कांदिवलीचा श्री गणपती मंडळाचे सागर बामणोलीकर आणि चारकोपचा राजा माघी गणेशोत्सव मंडळाचे निखिल गुढेकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात मूर्ती सांभाळणे अवघड

एका मंडळाची मूर्ती तलावात अर्धवट विसर्जित झाली होती. त्यामुळे कृत्रिम तलावात विसर्जन केले आणि मूर्तीची विटंबना झाली तर मंडळाचे नाव बदनाम होईल अशी भीती आम्हाला होती. म्हणून आम्ही विसर्जन केले नव्हते. पावसाळ्यात मुर्ती सांभाळून ठेवणे अवघड जात असल्याचे कांदिवलीचा श्री गणपती मंडळाचे सागर बामणोलीकर यांनी सांगितले.