पाचव्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष जाहीर

मुंबई : विषाणूच्या नवीन प्रकाराचा किती प्रसार झाला याच्या चाचणीसाठी केलेल्या पाचव्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष नुकतेच पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले आहेत. पाचव्या टप्प्यातील चाचणीमध्ये २२१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ओमायक्रॉनचे फक्त दोन रुग्ण आढळले असून ते यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत. या नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’चे ११ टक्के, तर ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’चे ८९ टक्के रुग्ण आढळले आहेत.

मुंबई महापालिकेने करोना विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण करण्यासाठी केलेल्या जनुकीय चाचण्यांच्या पाचव्या तुकडीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. नमुने संकलित केलेल्या २२१ पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. करोना लसीकरण वेगाने होत असल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील करोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 

करोना विषाणूच्या नवीन प्रकारांचा संसर्ग किती पसरला आहे याची तपासणी करण्यासाठी पालिकेच्या वतीने नियमितपणे विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण चाचण्या करण्यात येतात. महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्र्वेंसग लॅब आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांनी एकत्रितपणे ही पाचवी चाचणी पार पाडली. करोनाची बाधा झालेल्या एकूण २७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २२१ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत.

चाचणीचे निष्कर्ष

मुंबईतील २२१ रुग्णांपैकी १९ रुग्ण (९ टक्के) हे ० ते २० वर्षे वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ६९ रुग्ण (३१ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ७३ रुग्ण (३३ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ५४ रुग्ण (२५ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ६ रुग्ण (३ टक्के) यांमध्ये समाविष्ट आहेत. तुलनेने बालक व लहान मुलांना करोनाची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे. २२१ पैकी २४ रुग्ण (११ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर १९५ रुग्ण (८९ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ प्रकारातील करोना विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित दोघे ओमायक्रॉन विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण संकलित नमुन्यांच्या संख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.

मुंबईत ओमायक्रॉन बाधित दोन रुग्ण असून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची करोना चाचणी केली असून त्यापैकी कोणालाही करोनाची बाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटिव्ह या दोन्ही प्रकारातील करोना विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास डेल्टा डेरिव्हेटिव्ह विषाणू संक्रमण/ प्रसार वेग कमी असल्याचे आढळले आहे.

दोन्ही मात्रा घेतलेले २६ रुग्ण… करोना लसीकरणचा निकष विचारात घेतल्यास, या २२१ पैकी पहिली मात्रा घेतलेल्या फक्त एका रुग्णाला तर दोन्ही मात्रा घेतलेल्या अवघ्या २६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लशीची एकही मात्रा न घेतलेल्या ४७ पैकी १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सुदैवाने या २२१ पैकी कोणाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. लस घेणाऱ्यांना विषाणू बाधेपासून सर्वाधिक संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते.