दोन वर्षांनंतर चैत्यभूमीवर भीमसागर

महापरिनिर्वाणदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन कारण्यासाठी लाखो अनुयायी सोमवारी दादरच्या चैत्यभूमी परिसरात दाखल झाले होते.

महापरिनिर्वाणदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल झाले होते.

महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी दादरमध्ये

मुंबई : महापरिनिर्वाणदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन कारण्यासाठी लाखो अनुयायी सोमवारी दादरच्या चैत्यभूमी परिसरात दाखल झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत अनुयायांचे जथे चैत्यभूमीवर येत होते. पथनाटय़े, भीमगीतांनी चैत्यभूमी आणि आसपासचा परिसर दुमदुमून गेला होता. 

दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्य भरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. यंदा करोनामुळे घरून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याचे आवाहन राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने केले होते. पण ऐनवेळी व्यवस्थापनासाठी पालिकेनेच कंबर कसली. दरवर्षीच्या तुलनेने यंदा गर्दी कमी होती. अंदाजे सव्वा लाख अनुयायांनी चैत्यभूमीला भेट दिल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.  यंदा करोनामुळे चैत्यभूमी परिसरात स्टॉल्स उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. तरी काही विक्रेत्यांनी चैत्यभूमीच्या मार्गावर पुस्तके विक्री करीत होते. केवळ पुस्तकेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, मूर्ती विकणाऱ्या विक्रेत्यांनी रस्ते व्यापले होते. काही अनुयायी अभिवादनानंतर जाण्या-येण्याच्या मार्गावर भीम गीते गाऊन आंबेडकरी विचारांचा जागर करीत होते. काही संस्थांनी पुढाकार घेऊन मुखपट्टी, पाणी, अल्पोपाहार यांचे वाटप केले. तर ‘चैत्यभूमी, आपली भूमी, स्वच्छ भूमी’ असे फलक घेऊन काहींनी स्वच्छता राखण्यासाठी आवाहन करत होते.

चोख पोलीस बंदोबस्त

दादरमध्ये दिवभर अनुयायांची गर्दी होती. गोंधळ टाळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत होते. विनाकारण रस्त्यावर थांबून गर्दी करणाऱ्यांना पांगवले जात होते. शिस्तबद्ध पद्धतीने दिवस पार पडला. यासाठी दोन उपायुक्त, सात साहाय्यक पोलीस आयुक्त, सात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ११० इतर अधिकारी, एक हजार अंमलदार बंदोबस्ताला होते, अशी माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण सतीश कसबे यांनी दिली.

वाहतूक कोंडी

रेल्वे प्रवासास अटी घालण्यात आल्याने अनेकांनी खासगी वाहनांने दादर गाठले होते. परिणामी, दुपारी दादरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वीर कोतवाल उद्यान ते शिवाजी पार्कदरम्यान गाडय़ा कासवगतीने पुढे सरकत होत्या. रस्त्याने चालणारे अनुयायी, बाहेरून येणाऱ्या गाडय़ा आणि नियमित वाहतूक यांचे व्यवस्थापन करण्यात वाहतूक पोलिसांची तारांबळ उडत होती.

रांगेत उभ्या असलेल्या अनुयायांना उन्हाची झळ बसू नये म्हणून छत उभारण्यात आले होते. फिरते शौचालय, सुका खाऊ, पाणी यासह करोना चाचणी, लसीकरण, आरोग्य चिकित्सा केंद्र, औषध वाटप आदी सुविधांचे आयोजन पालिकेने केले होते. चैत्यभूमीवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मुखपट्टी आणि सॅनिटायझर देण्यात येत होते. घरून अभिवादन करणाऱ्यांसाठी ऑनलाइन प्रक्षेपणही करण्यात आले होते.  

किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी उत्तर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two years bhimsagar chaityabhoomi ysh