मुंबई : गोराई परिसरात दुचाकीने विजेच्या खांबाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. भाईंदर जवळील उत्तन – गोराई रस्त्यावर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. अपघातग्रस्त दुचाकीवरून तीन तरूण जात होते. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबईच्या शीव कोळीवाडा परिसरात वास्तव्यास असलेले तीन तरूण मंगळवारी सकाळी एकाच दुचाकीवरून भाईंदरच्या गोराई – उत्तन रस्त्यावरून जात होते. शिवम झा (२७) हा दुचाकी चालवत होता, तर रेहान चौधरी (२७) आणि दिनेश तेवर (२५) हे त्याच्या मागे बसले होते. या तिघांनी मद्यपान केले होते. दुचाकीने मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास एका विजेच्या खांबाला धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी भाईंदरमधील टेंभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शिवम झा आणि रेहान चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले, तर दिनेश तेवरवर उपचार सुरू आहेत. शिवम आणि रेहान कॉल सेंटरमध्ये काम करीत होते. दिनेश तेवर खासगी बॅंकेत विमा एजंट म्हणून काम करीत होता.
याबाबत माहिती देताना गोराई पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री तिन्ही मित्र माटुंगा येथे जेवणासाठी भेटले होते. तेथे त्यांचा अन्य एक मित्र भेटला. या चौघांनी मग गोराईला फिरण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे दोन दुचाकी होती. त्यावरून हे चौघे निघाले होते. मात्र चौथ्या मित्राने ऐनवेळी निर्णय रद्द केला आणि तो जोगेश्वरीवरून निघून गेला. त्यामुळे तिघे एका दुचाकीवर बसले आणि रात्री उशीरा गोराईला पोहोचले. ते मंगळवारी पहाटे ४ वाजता एका बंगल्यात उतरले होते. तेथे सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांनी मद्यपान केले. नंतर त्यांनी गोराई समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे ठरवले. मद्याच्या नशेत ते दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गोराई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.