मित्राच्या नावे व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवून पैसे उकळण्याचे प्रकार

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढीस लागले आहेत.

WhatsApp_privacy policy
व्हॉट्सअ‍ॅप

मुंबई : परदेशात मित्रआप्तेष्ट वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना हेरून त्यांना मित्राच्या नावे संदेश पाठवून पैशांची मागणी करण्याचे प्रकार सायबर चोरट्यांनी सुरू केले आहेत. अमेरिकीतील मित्राच्या नावाने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधून १० लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण मध्य विभागाच्या सायबर पोलिसांनी नुकतेच सोडवले. अशाच घटना मुलुंड, कुलाबा येथे घडल्याचेही उघड झाले.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढीस लागले आहेत. त्यातच आता परदेशातील मित्रमंडळींच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. मध्य विभागाच्या सायबर पोलिसांनी नुकतीच कांदिवली येथून सम्राट चौधरी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. याप्रकरणी तक्रारदार अजय मेहता यांना अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप संदेश आला होता. संपर्क करणाऱ्या आरोपीने आपण त्यांचे अमेरिकेतील मित्र श्रीराम सोमेश्वर असल्याचे भासवले. त्यासाठी आरोपीने श्रीराम यांचे छायाचित्र फेसबुक प्रोफाइलवर ठेवले होते. त्याला तात्काळ पैशांची गरज असल्याचे सांगून आरोपीने त्याच्या बँक खात्यात १० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार मेहता यांनी ही रक्कम त्याने सांगितलेल्या खात्यावर जमा केली. मेहता यांनी पुढे अमेरिकेतील मित्र श्रीराम यांना संपर्क साधला असता त्यांनी कोणताही संदेश पाठवला नसल्याचे सांगितले. त्या वेळी मेहता यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मुलुंड परिसरातही ७५ वर्षीय डॉक्टरला अशाच पद्धतीने फसवण्यात आले होते. एके दिवशी त्यांना बहारीन येथील डॉक्टर मित्राच्या नावाने दूरध्वनी आला. त्या वेळी ते शस्त्रक्रियेत व्यग्र असल्याने संपर्क झाला नाही. मात्र त्याच मित्राच्या नावाने त्यांना व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवून दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या डॉक्टरांनी पैसे बँक खात्यावर वळते केले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे मागाहून त्यांच्या लक्षात आले. दोन महिन्यांपूर्वी कुलाबा येथील ७५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्यालाही अशाच पद्धतीने फसवण्यात आले होते.

कसे सुरक्षित राहाल?

सायबरतज्ज्ञ विकी शाह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसह इतर समाजमाध्यमांवरील प्रोफाइलवर ‘टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन’ पर्याय निवडायची आवश्यकता आहे. तसेच असा संदेश आल्यानंतर त्या मित्राशी संपर्क साधून खात्री करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅपचे हॅकिंग असे…

सायबर भामट्यांनी व्हॉट्सअ‍ॅप खाते हॅक करण्यासही सुरुवात केली आहे. सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्हॉट्सअ‍ॅपचे कर्मचारी असल्याचे भासवून संवाद साधतात. ‘तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे,’ असे सांगून खाते सुरक्षित करण्यासाठी एक कोड पाठवण्यात येईल, असे ते वापरकत्र्याला सांगतात. तो कोड वापरकत्र्याकडून मिळवून त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपचे नियंत्रण आपल्याकडे मिळवतात. अशा परिस्थितीत सहा तास व्हॉट्सअ‍ॅपचे नियंत्रण या सायबर भामट्यांकडे राहाते, असे पोलिसांनी सांगितले. 

गुन्ह्याची कार्यपद्धत

सायबर भामटे समाजमाध्यमाच्या मदतीने परदेशात मित्र असलेल्या व्यक्तींना हेरतात.

त्यानंतर परदेशातील मित्राचे छायाचित्र समाजमाध्यमावरून मिळवून आपल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर ते जोडले जाते. अनेकदा परदेशातील मित्राचे व्हॉट्सअ‍ॅप खातेच हॅक करण्यात येते.

या क्रमांकावरून सावज असलेल्या व्यक्तीकडून पैसे मागवण्यात येतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Types of money laundering by sending whatsapp messages to a friend akp