मुंबई : राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सूर जुळून आल्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर दोघे एका व्यासपीठावर दिसणार आहेत. हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात दोघेही सहभागी होणार असून काँग्रेस आणि शरद पवार गटानेही मोर्चाला पाठिंबा दिला आहे.
राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मोर्चाची हाक दिली असताना उद्धव ठाकरे यांनी मराठी समन्वय समितीच्या ७ जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता. मात्र राज यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून एकच मोर्चा काढावा, त्यातून मराठी माणसाची एकजूट दिसून येईल, असा प्रस्ताव ठेवला. उद्धव ठाकरेही याला तयार झाले. मोर्चासाठी सध्या सकाळी १० वाजताची वेळ निश्चित झाली असली तरी त्यात काही बदल करण्याबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
स्वत:च्या पक्षाला शिवसेना म्हणवून घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे लपून बसले आहेत, असा सवालही त्यांनी केला. एकत्र मोर्चा काढण्याचे निश्चित झाल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना (ठाकरे) आमदार वरुण सरदेसाई यांनी दादरच्या जिप्सी हॉटेलमध्ये चर्चा केली. तसेच विधानसभा निवडणुकीला एकमेकांसमोर उभे ठाकलेले आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनीही एका कार्यक्रमात भेट झाली असता हस्तांदोलन केले.
काँग्रेस, पवार गटाचाही सहभाग
हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात काँग्रेस सहभागी होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी स्पष्ट केले. या मुद्यावर सर्व पक्ष, संस्था, साहित्यिक आणि मराठी प्रेमींचा एकच मोर्चा निघावा अशीच काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही मोर्चाला पाठिंबा दिला असून प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
‘शासन निर्णयाची होळी करा’
ठाकरे गट व मनसेचा एकत्र मोर्चा निघणार असताना आता उद्धव ठाकरे यांनी राज्यभर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. सर्व जिल्हे आणि तालुक्यांत येत्या रविवारी शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.