भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या या भूमिकेवर शाब्दिक हल्ला चढवला. तसेच भाजपाचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? असा सवाल केला. ते मंगळवारी (११ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत. आता मदरशांमध्ये जाऊन हे कव्वाली ऐकणार आहेत. दुसरीकडे बाबरी आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत. याचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? मी सांगतो की, आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसं भाजपाने एकदा स्पष्ट करावं की, याचं नेमकं हिंदुत्व काय आहे?”

“चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा मिंधेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”

“आमच्याकडच्या मिंधेंनी सत्तेसाठी लाचर होऊन लाळघोटेपणा केला आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप करत भाजपाचे पाय चाटायला गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा : “बाबरी पाडण्यात शिवसैनिक नव्हते”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; उद्धव ठाकरेंवर हल्ला करत म्हणाले…

“बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत”

“आता हे कुणाला जोडे मारणार आहेत की स्वतःच जोड्याने आपलं थोबाड फोडून घेणार आहेत? कारण ते केवळ आणि केवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत. त्यांनी काय चाटायचं ते चाटावं, आम्ही बघायलाही येणार नाही. मात्र, एवढं बोलल्यावर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray answer chandrakant patil claim about balasaheb thackeray babri masjid pbs
First published on: 11-04-2023 at 13:39 IST