मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने लवकरात लवकरच विचार करायला हवा असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याचे मनोज जरांगे यांनी या संवादाविषयी सांगितले.

मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे व खासदार अनिल देसाई यांनी आझाद मैदान येथे जरांगे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलनाविषयी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आझाद मैदानात एकवटला याने अचंबित झाल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. त्याचप्रमाणे शिवसैनिकांकडून आवश्यक मदत पुरविण्याचेही आश्वासन दिले. त्यापाठोपाठ शिवसेना (ठाकरे) खासदार अनिल देसाई यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

शिवसैनिकांनी पूर्ण मदत करावी, उद्धव ठाकरे यांचे आवाहन मराठा बांधवांसाठी शिवसैनिकांनी आवश्यक ती सर्व मदत करावी. महराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा मराठी बांधव एकवटला आहे. ही संख्या हजारोंच्या घरात असून पाऊस-पाण्यात चिखलात तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे.

सरकार त्यांना सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. अशा वेळी तमाम शिवसैनिकांना आवाहन आहे की या बांधवांना पाणी, अन्न, शौचालये अशश सुविधा पुरविण्यासाठी कंबर करून उभे राहा. हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. सरकार यांना सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार आझाद मैदान येथे जमलेल्या मराठा आंदोलकांना शिवसैनिकांकडून तातडीने पाण्याच्या बाटल्या तसेच अल्पोपहारही पुरविण्यात आला.