लक्ष्यभेदाचा परिणाम; आर्थिक आधारावर आरक्षणाच्या मागणीची शक्यता

शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवरच्या टीकेची धार ‘लक्ष्यभेदा’मुळे बोथट होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला फटका बसू नये, यासाठी अपरिहार्यतेमुळे मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला असला तरी खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांनाही आरक्षण हवे, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचाही शिवसेनेकडून पाठपुरावा केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा शिवसेनेवर राग असून उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे संबंध कायमच तणावाचे राहिलेले आहेत. ते शिवसेनेला फारशी किंमत देत नसल्याने उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेत्यांनी गेल्या अडीच वर्षांत भाजपबरोबर सत्तेत सहभागी असूनही मोदी व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा, काश्मीर प्रश्न, पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध, गोरक्षण, हिंदूत्व, दादरी प्रकरण आदींवरून ठाकरे यांनी मोदी व केंद्र सरकारला वारंवार लक्ष्य केले आहे. मात्र यंदा दसरा मेळाव्यात ठाकरे यांच्या टीकेची धार बोथट राहण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेतील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

लक्ष्यभेदानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे दूरध्वनी करून अभिनंदन केले व त्यांना पाठिंबा दिला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना सहभागी असून आता मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करायची की नाही, यावर अजून निर्णय झालेला नाही. सरकार टिकविण्यासाठी फडणवीस यांना युती हवी आहे आणि अमित शहा हट्टाला पेटले, तर शिवसेनेच्या महापालिकेतील सत्तेला सुरुंग लावल्याखेरीज ते शांत बसणार नाहीत, याची ठाकरे यांना जाणीव आहे. शिवाय, मोदी व शहा यांच्यावरची व्यक्तिगत टीका सहन करायची नाही, अशी भाजप नेत्यांची भूमिका असल्याने ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये शिवसेना नेत्यांना आवरले आहे. भाजपशी शक्यतो जुळवून घ्यावे, नाही तर शिवसेनेलाही त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि विरोधी पक्षांना त्याचा लाभ होईल. यामुळे महापालिकेसाठी युतीचा निर्णय होईपर्यंत शक्यतो किमान मोदी व शहा यांच्यावर पूर्वीइतकी जोरदार टीका करणे ठाकरे टाळतील, अशी शक्यता आहे.

लक्ष्यभेदावरून विरोधकांनी राजकीय वादळ उठविले असले तरी पंतप्रधान मोदी यांना सर्वसामान्यांनी पािठबा दिला आहे. त्यामुळे तशाच पद्धतीने राममंदिर, काश्मीर, समान नागरी कायदा याबाबत कठोर निर्णय घ्यावा अशा मोदी यांच्याकडून शिवसेनेच्या अपेक्षा आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध राखले आहेत. त्यामुळे ठाकरे यांनी त्यांच्यावर कधीच टीका केलेली नाही व पाठिंबाच दर्शविला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर ते फारशी टीका करण्याची शक्यता नाही. मराठा समाजाच्या भावना दुखावणाऱ्या व्यंगचित्रामुळे ठाकरे यांना माफी मागण्याची वेळ आली. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी जरी जातपात न मानता आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणाची भूमिकाच कायम घेतली, तरी आगामी निवडणुका लक्षात घेता मराठा आरक्षणाला विरोध करणे शिवसेनेला राजकीयदृष्टय़ा परवडणारे नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला पाठिंबा देतानाच खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठीही ते हवे, अशी भूमिका ठाकरे यांच्याकडून मांडली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.