राज्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर एकेकाळचे विरोधक असलेले भाजपा-राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) एकत्र येत सत्तेत सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का याविषय तर्कवितर्क लावले जात आहेत. आता स्वतः उद्धव ठाकरेंनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (२७ जुलै) खासदार व शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेला आधार असता, तर माध्यमांमधील चर्चा थांबली नसती. चर्चा झाली आणि चर्चा थांबली. ज्याने चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्याला आधार मिळाला नाही, त्यामुळे ती चर्चा थांबली असेल.”

“मी प्रस्ताव आला तर, गेला तर यावर विचार करत नाही”

असा प्रस्ताव आला तर? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका घेतली. “मी प्रस्ताव आला तर, गेला तर यावर विचार करत नाही. गेला तरी विचार करत नाही आणि आला तरी मी त्यावर विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. त्यामुळे आत्ता तरी तशी काही चर्चा नाही. त्यामुळे त्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : अजित पवारांच्या शपथविधीचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “शरद पवारांचे…”

“त्यांना मोठं करणारी माणसं माझ्याबरोबर”

शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर माणसं बाहेर पडल्याबाबत संजय राऊतांनी विचारणा करताच उद्धव ठाकरेंनी त्यावरून टोला लगावला. “मोठे लोक बाहेर नाही पडले. तथाकथित मोठी माणसं बाहेर पडली. पण ज्यांनी त्यांना मोठं केलं ती माणसं माझ्यासोबत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंप्रमाणे शरद पवार कायदेशीर लढाई करत नाहीत?

शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कायदेशीर लढा दिला. मात्र, शरद पवारांनी वेगळा मार्ग निवडल्याबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “ज्याचा त्याचा मार्ग असतो. मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे जशास तसं उत्तर देणारा, आरेला कारे करणारा मी आहे. त्यामुळे मी लढतोय. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. ते त्यांच्या पद्धतीने जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे”, असं ते म्हणाले.