माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख ‘मोगॅम्बो’ करत जोरदार टीका केली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अमित शाहांवर निशाणा साधला आहे. मोगॅम्बोच्या अनेक पिढी उतरल्या तरीही शिवसेना संपणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं. ते मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली.

हेही वाचा- ‘शिंदे गटाचे घोटाळे भाजपाच उघड करतंय’; आदित्य ठाकरेंच्या विधानावर संदिपान भुमरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, शिवसेनेची वीण घट्ट आहे. आपली मूळं रुजली आहेत. त्यामुळे तुम्ही वरचे शेंडे-बुडके उडवा, काहीही फरक पडणार नाही. कुणाला वाटलं असेल की, ही फुलं तोडली म्हणजे झाड मेलं असेल, पण असं अजिबात नाही. काही वेळा बांडगुळं छाटली जातात. कारण ती बांडगुळं छाटावीच लागतात. ती आपोआप गळून पडत असतील तर आम्हाला आनंद आहे.

हेही वाचा- “…हा हलकटपणा आहे”, शिंदे गटाच्या ‘त्या’ कृत्यावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

“अनेकदा बांडगूळ एवढं वाढतं की, बांडगुळाला वाटतं की तो स्वत: वृक्ष झाला आहे. पण झाडासाठी रस शोषणारी जी पाळं-मुळं असतात ती जमिनीत खोलवर रुजवावी लागतात. फाद्यांवरची जी बांडगुळाची पाळंमुळं असतात, ती फांदी छाटली की बांडगूळ मरतं. शिवसेना ही वृक्षाप्रमाणे निर्माण झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात… प्रत्येक ठिकाणी अन्यायावरती प्रहार करण्यासाठी शिवसेनेच्या शाखा कार्यरत आहेत. याचा मला अभिमान आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- सत्यजीत तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?; स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाहांवर अप्रत्यक्ष टीका करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसैनिकांच्या मनात जे धगधगते विचार आहेत, तीच खरी शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे केवळ नाव किंवा चिन्ह नाही. केवळ धनुष्यबाण म्हणजे शिवसेना नाही. शिवसेना आपली आहेच. तिला कुणीही चोरू शकत नाही. पण शिवसेनाप्रमुखांनी जे काही पेरलं आहे, ते तुम्ही आमच्यातून कसं काढाल? आमच्या नसा-नसात आणि रगा-रगात जी शिवसेना भिनली आहे, ती शिवसेना तुम्ही आमच्यातून कसं काढाल, ही शिवसेना कुणीही काढू शकत नाही, अगदी मोगॅम्बोच्या पिढ्या आल्या तरीही त्यांना शिवसेना संपवणं शक्य नाही.”