देशातील जनता आणि व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवल्यामुळेच सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) रचनेत बदल करावा लागला. यानंतर केंद्र सरकारकडून जनतेला दिवाळी भेट दिल्याचे चित्र रंगवले जात आहे. मात्र, सरकारला हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर ‘कौतुकमिश्रीत’ टीका केली.
सध्या देशातील सगळ्या सणांची रया गेली आहे. याचे कारण सगळ्यांना माहितीच आहे. सध्या लोकांपुढे दिवाळीत लक्ष्मीपूजन कसं करायचं, हा मोठा प्रश्न आहे. कारण सगळी ‘लक्ष्मी’ केंद्र सरकारने ओरबाडून घेतली आहे. सणांच्या काळात माणूस सर्व दु:ख आणि चिंता बाजूला ठेवून आनंद साजरा करतो. मात्र, या सरकारने ती सोयही ठेवलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आणि असंतोष वाढू लागला होता. परंतु, याची धग सरकारला वेळीच जाणवल्यामुळेच सरकारने जीएसटीच्या रचनेत बदल केले. त्यानंतरही सरकारकडून आम्ही जनतेला दिलासा दिला, दिवाळी भेट दिली, असे चित्र रंगवण्यात आले. परंतु, जनतेने आणि व्यापाऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळेच सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले, असे उद्धव यांनी सांगितले. मात्र, सरकारने वेळीच या असंतोषाची दखल घेतल्याचे सांगत उद्धव यांनी आपल्याला सरकारच्या चांगल्या निर्णयांचे कौतुक करण्यात कोणताही कमीपणा वाटत नसल्याचेही म्हटले. याशिवाय, राज्यातील भाजप सरकारने अंगणवाडी सेविकांचा आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरातून फेरीवाल्यांना हटविण्याची शिवसेनेची मागणी मान्य केल्याबद्दल उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मात्र, यावेळी उद्धव यांच्याकडून राज्य सरकारच्या कौतुकापेक्षा संबंधित मुद्द्यांचे श्रेय घेण्याचाच प्रयत्न जास्त दिसून आला. तत्पूर्वी आज गुजरातमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीचे समर्थन केले. जीएसटीत केंद्र सरकारकडून काल महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यामुळे देशात १५ दिवस आधीच दिवाळी आली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.