मुंबई: मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही कारवाई होत नाही. रमी खेळणारा क्रीडामंत्री हाेतो. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही. लाडक्या बहिणींची फसवणूक थांबायला हवी. एखाद्या गोष्टीत एखाद्याला त्रास द्याचा आणि त्यानंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण तुमचे कसे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचे असा प्रकार सध्या सुरू आहे. इतके हतबल मुख्यमंत्री मी पाहिले नाहीत, कुणी कुणाला जाबच विचारू शकत नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब बिलेवर यांच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकरी क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद मिळाले, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मागणी केली नसतानाही पहिल्यांदा शेतकरी कर्जमाफी केली. शेतकरी क्रांती संघटनेचे वेगळे अस्तित्व होते. तरी ही संघटना शेतकरी संघटनेत का विलीन केलीत? शिवसेनेत आणि आपल्यात तुम्ही काय पाहिले असा सवाल करताना आयुष्यात सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अनेकजण शिवसेनेला संपवायला निघालेत, पण त्यानंतरही ती का संपत नाही असा प्रश्न त्यांना पडलाय. गद्दार पैशांनी विकले जाऊ शकतात, पण निष्ठावंत विकले जाऊ शकत नाहीत, म्हणूनच सर्व जुने सहकारी आपल्यासोबत आहेत. ज्या लोकांना मोठे केले ते आपल्याला सोडून गेले. पण ज्यांनी त्या लोकांना मोठे केले ती माणसे आपल्यासोबत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणुकीतले घोटाळे आता बाहेर येताहेत
विधानसभा निवडणुकीत जे काही घडले ते अनाकलनीय आहे. आपल्याला कुणालाही असे वाटले नव्हते की, असा वेगळा निकाल लागेल. पण मला खात्री आहे की, आपल्या महाराष्ट्रातील जनता, माझ्या माता-भगिनी एवढी उफराटी नाही. आपण एवढी सगळी कामे केली, त्यानंतरही ते असे काही करणार नाहीत. त्यामुळे काहीतरी गडबड घोटाळा नक्की झाला आहे. आता हे सर्व घोटाळे एकेक बाहेर येत असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींमध्ये किती पापी घुसलेत, ते कुणी घुसवले, पैसे कुठे गेले असा सवाल करताना सामाजिक न्याय विभागाचे पैसे लाडक्या बहिणींसाठी वळविण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले. हे सर्वकाही ओढून ताणून सुरू आहे. आत्ता बहिणींची सुद्धा आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे, याकडे शिवसेनेच्या (ठाकरे) महिला पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशा सूचना त्यांनी केल्या. महायुतीने दाखवलेल्या स्वप्नाला काही लोक भुलले असतील, पण निवडणूक झाल्यानंतर आता त्यांचे खरे रूप समोर येत असल्याचे सांगताना आश्वासन देऊनही कर्जमुक्ती न झाल्याने कर्जमुक्तीचे आंदोलन सुरूच ठेवले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीसांची नीतिमूल्य समिती कुठे गेली?
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरोप झाले की मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात होते. पण आता स्थिती वेगळी आहे. आम्ही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. कारवाईची अपेक्षा होती, पण तसेच झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेली नितीमूल्य समिती कुठे गेली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने राजीनामा घेण्याऐवजी मंत्र्यांना समज दिली. त्यांना सोडून दिले. धुळ्यात पकडण्यात आलेल्या रोख रकमेचा तपास थंडावला. बॅगा घेऊन बसलेल्या लोकांची काहीही चौकशी झाली नाही. त्यामुळे आता कितीही घोटाळे केले तरी हरकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
रमी, तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये मागणी होईल!
कृषिमंत्री कोकाटे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. कदाचित रमी व तीन पत्तीला आता ऑलिम्पिकमध्ये मागणी होईल. कारण, पहिल्यांदा जो ज्याचा विषय आहे, त्याला ते खाते देण्यात आले आहे. नाहीतर त्यांचे कृषिखाते नव्हतेच. ते केवळ शेतकऱ्यांची थट्टा व मस्करी करत होते. पण आता रमी खेळणारा माणूस क्रीडामंत्री झाला, अशी टीका करताना मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा विद्रुप चेहरा लोकांपुढे न्यावा लागेल. याविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आपण राज्यात लवकरच हे आंदोलन छेडणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.