राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाईट रुढीपरंपरांवर बोलताना पितृपक्ष चांगला की वाईट यावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं. ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन नियतकालिकातील लेखसंग्रह ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. सचिन परब यांनी प्रबोधनकारांच्या लेखांच्या ३ खंडांचं संपादन केलं असून मराठी साहित्य मंडळाने याचं प्रकाशन केलंय. यावेळी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचंही लोकार्पण करण्यात आलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकशाहीत मत महत्त्वाचं आहे, पण बोलण्याची हिंमत पण लागते. मत नाही मिळालं तरी चालेल, पण हिंमत पाहिजे. १०० वर्षांपूर्वीच्या गोष्टींना महत्त्व आहे की नाही हे बघणाऱ्यांवर अवलंबून आहे, पण या काळात ज्या वाईट रुढीपरंपरा होत्या त्या मोडण्यासाठी तेव्हाच्या लोकांनी काय केलं, मग आपण काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी या साहित्याचं महत्त्व आहे.”

“पितृपक्ष चांगला की वाईट? पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी”

“नुकताच पितृपक्ष होऊन गेला. पितृपक्ष चांगला की वाईट? या काळात चांगलं काम करू नये असं म्हटलं जातं. मात्र, मला जेव्हा एखादी गोष्ट करायची आहे आणि पितृपक्ष आहे असं विचारलं जातं, तेव्हा मी माझा पक्ष पितृपक्ष आहे, तो वडिलांनीच स्थापन केल्याचं सांगतो. वडिलांनी स्थापन केलेला पक्ष हा पितृपक्ष नाही का? त्यामुळे ही सर्व भोंदूगिरी आहे,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

“प्रबोधनकार ठाकरे नास्तिक होते का?”

प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे नास्तिक होते का? तर अजिबात नाही. त्यांची देवीवर प्रचंड श्रद्धा होती. पण ढोंगावर लाथ मार, ढोंगबाजी नाही पाहिजे असं ते सांगायचे. त्यांनी केवळ हे लिहून सोडून दिलं नाही, तर जिथं जिथं ढोंग दिसलं तिथं त्यांनी लाथा मारल्यात. काय होईल ते होईल. त्यांना फूटबॉलपटूच म्हणावं लागेल.”

“घरावर कचरा टाक, मेलेली कुत्री टाक असं सर्व प्रबोधनकारांनी भोगलं”

“कुणावर काही टीका केली की घरावर कचरा टाक, मेलेली कुत्री टाक असं सर्व प्रबोधनकार भोगत आलेत. त्यातूनच ते मोठे झालेत. तो एकाकी माणूस होता. संघटन वगैरे काही नव्हतं. त्यांनी तेव्हा जी विचाराची बीजं पेरली ती आज इतकी फोफावली आहे की हे चित्र आपण सर्वजण पाहतोय,” असंही त्यांनी नमूद केलं.

“लहानपणी प्रबोधनकारांनी राजा-राणीच्या नाही, तर राजवाड्यांच्या गोष्टी सांगितल्या”

उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे. आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा किती मोठे होते हे कळते. मी काही फार त्यांच्या विचारांचा अभ्यास केला नाही, पण त्यांच्या सहवासात शिकलो. प्रबोधनकार कसे कडक शिस्तीचे होते ते आम्हाला बाळासाहेब सांगायचे. पण मी नातू असल्याने माझ्या वाट्याला सुदैवाने ते आले नाही. त्यावेळी आमच्या लहानपणी आजोबांनी राजा राणीच्या गोष्टी सांगितल्या नाही तर राजवाड्यांच्या गोष्टी सांगितल्या.”

“कुणी समोरून स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचाराने आला तर मी एक कडवट हिंदू”

“आपण माणूस म्हणून पहिल्यांदा जन्माला येतो. देश हाच धर्म आहे, पण कुणी समोरून स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचाराने आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे. लोकशाहीत मत महत्वाचे आहे, पण हिंमत सुद्धा लागते. पूर्वीच्या काळातल्या वाईट चालीरितीच्या विरोधात त्या काळी प्रबोधनकार ठामपणे उभे राहिले. माझे आजोबा नास्तिक नव्हते पण ढोंग त्यांना आवडत नव्हते, ते सरळ लाथच मारायचे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमचं शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही”

“आमचं शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही. प्रबोधनकारांचे ग्रंथ साहित्य देशात सर्व राज्यात पोहचवावे त्यासाठी त्याचे भाषांतर झाले पाहिजे. नवहिंदू प्रकार फार घातक आहे. हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीसारखे होते आहे. शंभर वर्ष झाल्यानंतर सुद्धा माझ्या हस्ते प्रकाशन होते आहे हे माझ्यासाठी समाधान देणारे, भाग्याचे आहे. हीच भावना बाळासाहेबांवरील फटकारे पुस्तकाचे प्रकाशन केलं त्यावेळी होती,” असंही त्यांनी नमूद केलं.