पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहाणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुस्लिम लांगुलचलनाचे घातक राजकारण खेळत असून हिंदूंना दुखावून त्यांना कधीही पंतप्रधान होता येणार नाही, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. अजित पवार व शरद पवार यांच्या राजकीय नौटंकीतून जनतेचे कोणतेही हित साधले जाणार नाही, असे सांगून हिंदुत्वाच्या विरोधात जाऊ नका असा इशारा उद्धव यांनी दिला.
वांद्रे येथील रंगशारदामध्ये आयोजित ‘मार्मिक’च्या वर्धापनदिनी उद्धव यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना आत्ताच पवारांना मुस्लिमांचे एवढे प्रेम कोठून आले असा सवाल केला. सध्या पवार सारखे इशरत इशरत करत आहेत. ती जर निर्दोष होती तर अतिरेक्यांबरोबर काय करत होती असा सवालही उद्धव यांनी केला. या देशातील सर्व मुस्लिम अतिरेकी आहेत अथवा त्यांना सामील आहेत असे आम्हीही म्हणत नाही. परंतु अतिरेक्यांसमवेत सापडलेल्या इशरतच्या नावाचा जप करताना जे घातक राजकरण करत आहेत त्याचे भान त्यांनी जरूर बाळगावे. किश्तवाडा आणि गोध्रात जे घडले त्याबाबत शरद पवार का तोंड उघडत नाहीत असा सवाल करून आम्ही हिंदुत्वाचा गजर केला तर जातीयवादी आणि यांनी मुस्लिमांचे लांगुलचालन केले तर हे निधर्मवादी ठरतात, असा टोलाही त्यांनी लगावला. हिंदुत्वाच्या विरोधात जाण्याची हिम्मत करू नका असा असे सांगून हिंदुच्या भावना डावलून या देशात पंतप्रधान बनता येणार नाही, असा इशारा दिला. पुण्यातील खड्डे पाहण्यासाठी अजित पवार उतरले आणि पावसामुळे खड्डे पडल्याचे सांगू लागले. पुण्यात पावसामुळे खड्डे पडतात आणि मुंबईत काय शिवसेना खड्डे पाडते असा सवालही त्यांनी केला. पाकिस्ताकडून वारंवार भारतीय जवानांवर हल्ले होत असून त्याला चोख उत्तर देण्याची गरज आहे. पाकिस्तानची मस्ती उतरविण्याची गरज असताना पंतप्रधान मनमोहन सिंग मात्र गप्प बसून आहेत. स्वातंत्र्यदिनी कदाचित ते तोंड उघडतीलही परंतु ती बोलाची बात आणि बोलाची कढीच असेल असेही उद्धव म्हणाले.