मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडत आहे. तीन-चार वर्षे झाली, कधी आपला प्राण सोडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्या लोकशाहीच्या तोंडात वेळेत न्यायाचे पाणी टाकले नाही तर देशाची लोकशाही मरेल. खंडपीठ कोणतेही असले तरी त्यामध्ये आपण लक्ष घालावे, असे आवाहन सरन्यायाधीशांना करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत खंत व्यक्त केली.

व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’च्या ६५ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या सोहोळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि इतर गोष्टी सुरू असताना सध्या आपले लक्ष कबूतर आणि कुत्र्यांकडे भरकटवले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता देशभरातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. मनेका गांधी यांनी म्हटले की, असे कुत्रे पकडले तर दिल्लीत झाडांवरची माकडे खाली येतील. पण माकडे यापूर्वीच संसदेत पोहोचली आहेत, आपण हे उपहासाने बोलत नसून तसा माकडाचा व्हिडीओ जयराम नरेश यांनी ट्विट केला असल्याचीही मिश्कील टिपणी त्यांनी केली.

मुंबई ही मराठी माणसाने मिळवलेली असली तरी या मुंबईतच मराठी माणूस उपरा झाला होता. पण आता तशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे. अजूनही मुंबई, महाराष्ट्राचा लचका तोडता येईल काय, याचा प्रयत्न अधूनमधून चोची मारून केला जात आहे. मग तो हिंदी सक्ती किंवा मुंबईचे महत्व मारण्याच्या निमित्ताने असेल, पण हे प्रयत्न थांबलेले नाहीत. हे प्रयत्न जोपर्यंत थांबत नाही किंवा हे प्रयत्न करणाऱ्यांना आपण संपवत नाही, तो पर्यंत शिवसेनेचे काम थांबणार नाही, असे ते म्हणाले.

पूर्वी दाम करी काम या चित्रपटात वासूदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे… असे ते गाणे होते. पण आता तो सिनेमा काढला असता तर जगात नाही राम म्हटल्यावर… नव हिंदुत्ववादी, भोंदू हिंदुत्वद्यांनी बंदी घातली असती. म्हणजे तोंडाने राम राम करायचे, जय श्रीराम बोलायचे आणि पैसे देऊन धुमाकूळ घालायचा, असे यांचे धंदे आहेत, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.