मुंबई : मोदी हे आपले शत्रू नाहीत मात्र ते आपल्याला शत्रू मानत असतील. ज्या पद्धतीने ते शिवसेना संपवायला निघाले आहेत, ते कारस्थान मात्र सहन करू शकत नाही, असे ठणकावत पंतप्रधान मोदी यांनी पुढची वर्षे चांगला कारभार करावा, अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना ७५ वाढदिवसानिमित्त दिल्या.
मातोश्री निवासस्थानी मंगळवारी धाराशिव जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करताना अमित शहांचा मुलगा जय शहाच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा सरकारने केला. एकीकडे पाकिस्तानला दहशतवादाचे आश्रयस्थान म्हणायचे दुसरीकडे त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायचे, हा दुटप्पीपणा देशासाठी घातक असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.
बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमधील राजकीय उलथापालथीचा दाखला देताना उद्धव ठाकरे म्हणाले, क्रांती नेते करत नाहीत, तर सर्वसामान्य माणूस करतो. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा, ही म्हण राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवी, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूतकाळामध्ये अनेक गोष्टी केल्या होत्या. आता त्या सगळ्या घोषणांची भूते त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी बोलले होते, १५ लाख रुपये येणार होते. स्मार्ट सिटी बोलले होते. अच्छे दिन आयेंगे म्हणाले होते. या भूतकाळाच्या घोषणांची भूते त्यांच्या मानगुटीवर बसलेली आहेत, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
लाखो कोटी रुपयांचे कर्ज फेडणार कसे?
राज्य सरकारचे कर्ज ९ लाख कोटींवर जाणार असलेल्या वृत्ताचा दाखला देताना त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती डळमळीत झाली असल्याकडे लक्ष वेधले. राज्याचे दिवाळे वाजले तरीही कर्ज काढून दिवाळी साजरी केल्यासारखा कारभार सरकार करत आहे. पुढील तीन महिन्यांत राज्यावरील कर्जाचा बोजा नऊ लाख कोटींवर जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर कर्ज येणार, ते फेडणार कसे, असा सवाल करत सरकार कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘मोदक खाल्ल्याचीही चर्चा’
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या भेटीच्या मुद्द्याबाबत विचारलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले. गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या घरी गेलो. माझ्या वाढदिवसाला ते मातोश्रीवर आले. आम्ही किती मोदक खाल्ले याचीही चर्चा झाली, असे ते म्हणाले. यावेळी दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का, असे विचारण्यात आले असता ‘ते येतील, पण माध्यमांनी जरा थांबावे’, असे सूचक विधान त्यांनी केले.
मनसेसोबतच्या युतीची लवकरच घोषणा
शिवतीर्थ निवासस्थानी गेल्या मागचे कारण सांगताना त्यांनी मावशीने (राज ठाकरेंची आई) घरी येत राहा, असे सांगितले होते. त्यानुसार असेच येणे-जाणे सुरू आहे, असे ते म्हणाले. युतीची घोषणा कधी करणार यावर ‘लवकरात लवकर घोषणा करण्यात येईल’ असे उत्तर त्यांनी दिले.