अध्यापनकौशल्य तसेच विद्याशाखेतील नवे प्रवाह, संशोधने याबाबत प्राध्यापकांना अद्ययावत ठेवण्यासाठी बंधनकारक असलेल्या उजळणी पाठय़क्रमात (रिफ्रेशर कोर्स) भारतीय ज्ञानाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा पाठय़क्रम पूर्ण करून वेतनवाढ वा बढतीसाठी पात्र ठरण्याकरिता प्राध्यापकांना वैदिक यज्ञ, पंचांग, पुण्य, मोक्ष, नक्षत्रे, पुराण यांचाही अभ्यास पक्का करावा लागणार आहे. 

शिक्षणात भारतीय ज्ञानाचा समावेश करण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर प्राध्यापकांसाठी असलेल्या दिशासाधन वर्ग (ओरिएन्टेशन) आणि उजळणी पाठय़क्रमामध्ये भारतीय ज्ञानाचा अभ्यास बंधनकारक करण्यात आला आहे.  प्रत्येक विद्याशाखेतील शिक्षकांना उजळणी अभ्यासक्रम पूर्ण केल्यास वेतनवाढ आणि पदोन्नतीचे लाभ मिळू शकतात. महाविद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत ओरिएन्टेशन अभ्यासक्रम पूर्ण करणेही आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात त्या त्या विद्याशाखेशी संबंधित अद्ययावत अभ्यास, संशोधन यांचा समावेश असतो. आता यात भारतीय ज्ञानाचीही भर पडली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) भारतीय ज्ञानरचनेबाबतचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. एकूण अभ्यासवर्गाच्या १० टक्के भाग हा भारतीय ज्ञानरचनेचा असणार आहे. भारतीय ज्ञानरचनेच्या अभ्यासासाठी एकूण ३० तास द्यावेत, असेही या आराखडय़ात नमूद करण्यात आले आहे.

रसशास्त्र, ज्योतिष, तीर्थक्षेत्रे..

दिशासाधन अभ्यासक्रमात पुण्य, आत्मा, कर्म, यज्ञ, शक्ती, वर्ण, जाती, मोक्ष, लोक, दान, पुराण, प्रजा, लोकतंत्र, प्रजातंत्र, स्वराज्य, सुराज्य, राष्ट्र, देश अशा संकल्पनांची ओळख करून दिली जाईल.

रसायनशास्त्रात आयुर्वेदातील रसशास्त्र, अर्थशास्त्रात धर्मशास्त्र, महाभारताच्या अनुषंगाने अर्थशास्त्राचा अभ्यास, कला आणि वास्तुकला अभ्यासक्रमात वैदिक यज्ञ, वास्तुपुरुष या संकल्पना आणि तीर्थक्षेत्रांचा अभ्यास करावा लागेल.

भूगोलात भारतवर्षांचा भूगोल अभ्यासावा लागेल. खगोलशास्त्रात वेदांग ज्योतिष, पंचांग यांचा तर शेतीचा अभ्यास करताना नक्षत्रांनुसार शेतीचे नियोजन शिकावे लागेल.