मुंबई : सध्या मुक्त व दूरस्थ संस्थांमध्ये जुलै- ऑगस्ट २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत देशभरातील विविध संस्थांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) मागणी केली होती. याची दखल घेत यूजीसीने मुक्त व दूरस्थ अभ्यासक्रमाची १५ सप्टेंबरची अंतिम मुदत वाढवून ती १५ ऑक्टोबर केली आहे. त्यामुळे दूरस्थ किंवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
जुलै- ऑगस्ट २०२५ या शैक्षणिक सत्रासाठी मान्यताप्राप्त व अधिकृत उच्च शैक्षणिक संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या मुक्त व दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र मुक्त व दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत यूजीसीकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत यूजीसीने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम तारीख १५ सप्टेंबरवरून १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रक यूजीसीकडून सर्व संस्थांना पाठविण्यात आले आहे. या सुधारित वेळापत्रकाचे पालन करण्याचा आणि वेळोवेळी जारी केलेल्या संबंधित नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना यावेळी यूजीसीने दिल्या आहेत.
प्रवेश प्रक्रियेबाबत यूजीसीने वेळोवेळी विविध तपशीलवार जाहीर केलेल्या सूचना https://deb.ugc.ac.in/Uploads/Notices Upload.pdf येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच मुक्त व दूरस्थ किंवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांना विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यापूर्वी घ्यावयाच्या खबरदारीची माहिती दिली आहे. तसे विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना यूजीसीच्या संकेतस्थळावर उच्च शिक्षण संस्थेची व संबंधित अभ्यासक्रमाची मान्यता स्थिती पडताळण्याचा सल्ला दिला आहे.