मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ११ आणि जिंजी येथील मिळून १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळणे म्हणजे मराठा इतिहासाचा जागतिक ठिकाणी झालेला गौरव आहे. ही संपूर्ण भारतासाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद््गार केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी काढले.
सह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांना युनिस्कोने प्रदान केलेल्या जागतिक वारसा मानांकनाच्या निमित्ताने कर्तव्यपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या या अमूल्य वारशाचे युनेस्कोने केलेले मानांकन म्हणजे संपूर्ण राष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा विजय आहे, असे ते म्हणाले. त्यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही विशेष आभार मानले.
राज्याच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले. हे गड-किल्ले फक्त लढाया आणि पराक्रमाची साक्ष नाहीत, तर जनकल्याणाची प्रेरणास्थळे आहेत, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना एकत्रित वारसा दर्जा मिळणे ही बाब ऐतिहासिक आहे. हा सांस्कृतिक पुनर्जागरणाचा संदेश देणारा ऐतिहासिक टप्पा असून यापुढे संरक्षण, व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाची जबाबदारी अधिक वाढल्याचे शेलार यांनी नमूद केले.
त्यावेळी सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते कॉफी टेबल बूकचे प्रकाशन करण्यात आले.