मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील आग्रा नजीकच्या सिंगणा येथे आंतरराष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्र उभारण्याला मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्रांतर्गत (सीआयपी) दक्षिण आशियासाठीचे प्रादेशिक केंद्र सिंगणा येथे उभारले जाणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या वतीने हे संशोधन केंद्र उभारले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय बटाटा संशोधन संस्थेचे मुख्यालय पेरू देशातील लिमा येथे आहे. प्रामुख्याने बटाटा. रताळी आणि दक्षिण अमेरिकेत उत्पादीत होणाऱ्या कंद मुळांवर संशोधन केले जाते. या संशोधन संस्थेचे प्रादेशिक केंद्र सिंगणा येथे उभारले जाईल. उत्तर प्रदेश सरकारने या केंद्रासाठी दहा हेक्टर जागा केंद्र सरकारकडे वर्ग केली आहे. केंद्र सरकारने यासाठी १११.५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

भारत जगातील प्रमुख बटाटा उत्पादक देश आहे. संशोधन केंद्राच्या वतीने हवामान बदल सहनशील बटाटा, रताळ्याचे वाण विकसित करण्यात येणार आहे. उच्च उत्पादकता असलेल्या बटाटा आणि रताळ्याची वाणांची लागवड भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात लागवड केली जाणार आहे. संशोधन करून अन्न व पोषण सुरक्षेत वाढ करणे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हा संशोधन केंद्राचा मुख्य उद्देश आहे. प्रामुख्याने संशोधन करून बटाटा व रताळ्याचे दर्जेदार, सुधारीत बियाणे उपलब्ध करून देणे. बटाटा आणि रताळ्याची उत्पादन क्षमता वाढविणे. काढणीनंतर प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून बटाटा, रताळ्यापासून मूल्यवर्धित पदार्थांचे उत्पादन करणे आदी बाबींवर संशोधन होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतामध्ये बटाटा क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, वाहतूक, विपणन व मूल्यसाखळी या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. या क्षेत्रातील संधींचा उपयोग करण्यासाठी आग्रा येथे प्रादेशिक केंद्र स्थापन केले जात आहे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.