मुंबई : दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा १६ जिल्ह्यांतील ९१ तालुक्यांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे एक लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून शेकडो जनावरेही दगावली आहेत. बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घोषणा होतात का, याकडे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील ३३ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिके, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत तर, अहमदनगर जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर शेती पाण्यात गेल्याचे चित्र आहे. मंगळवारी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात नद्यांना पूर आला असून अन्यत्र मुसळधार पावसाची नोंद झाली. नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे तसेच संपूर्ण विदर्भ पट्टय़ात बुधवारीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात कहर सुरूच नागपूर जिल्ह्यात मंगळवारी गारांसह मुसळधार पाऊस झाला. तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड तालुक्यात पावसामुळे नदीला पूर आला. पावसामुळे कापूस आणि तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली. तर १२ घरांची पडझड झाली. अनेक जनावरे देखील मृत झाली. विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील कौंडण्यपूरच्या यात्रेला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला.
हेही वाचा >>>शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात; उद्धव ठाकरे यांची टीका
मराठवाडय़ातही जोरदार जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहिला. बीड तालुक्यातील पाली येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून मराठवाडय़ातील ५९८ गावांमध्ये ४७ हजार १०९ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय १८० लहान-मोठय़ा व ओढकाम करणाऱ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. २४ हजार ८५५ हेक्टरावरील द्राक्ष, डािळब, मोसंबी आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी व ऊस ही दोन्ही पिके आडवी झाली आहेत. मात्र तूर पिकाला या पावसाचा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे.
नुकसानीचा प्राथमिक अंदाज
बुलडाणा : ३३ हजार हेक्टर
नाशिक : ३२ हजार ८३३ हेक्टर
अहमदनगर : १५ हजार ३०७ हेक्टर
जालना : ५ हजार २७९ हेक्टर
छ. संभाजीनगर : ४ हजार २०० हेक्टर
पुणे : ३ हजार ५०० हेक्टर
नंदुरबार : २ हजार २३९ हेक्टर
(जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यांतील शासकीय आकडेवारी)