मुंबई : गतवर्षी राज्यामध्ये झालेल्या गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर यंदा एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, तसेच केंद्र सरकारच्या गोवर रुबेला दुरीकरणाचे ध्येय डिसेंबर २०२३ पर्यंत गाठण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार मुंबईमध्ये लसीकरणासाठी ‘इंद्रधनुष – ५.०’ मोहिमेंतर्गत तीन टप्प्यात विशेष लसीकरण सत्र हाती घेण्यात येत आहे. या लसीकरण सत्रामध्ये मुंबईतील २,६३८ बालकांचे आणि ३०४ गरोदर मातांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने निश्चित केले आहे.

मुंबईतील गोवर रुबेलाची साथ आटोक्यात आणण्यासाठी ‘इंद्रधनुष -५.०’ मोहिमेंतर्गत यू-वीन प्रणालीद्वारे ७ ते १२ ऑगस्ट २०२३, ११ ते १६ सप्टेंबर २०२३ आणि ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ अशा तीन फेऱ्यांमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्‍यात येणार आहे. यामध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्‍या व अर्धवट लसीकरण झालेल्‍या ० ते ५ वर्षवयोगटातील बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण करण्‍यात येणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या गोवरच्या उद्रेकानुसार ७ जोखीमग्रस्त विभागात सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ० ते ५ वर्षवयोगटातील २,६३८ बालकांचे व ३०४ गरोदर मातांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे. या २,६३८ बालकांचे व ३०४ गरोदर मातांचे ७ ते १२ ऑगस्‍टदरम्यान यशस्वी लसीकरण करण्‍यात येणार आहे. ही मोहीम यशस्‍वी करण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागाने २४ विभागस्‍तरावर विभाग कृती दल समितीच्या बैठका घेतल्या आहेत.

हेही वाचा >>>मुंबईः मिठी नदीत मृतदेह सापडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाभार्थींना डिजीटल लसीकरण प्रमाणपत्र मिळणार

‘मिशन इंद्रधनुष ५-०’ मोहिमेंतर्गत मुबईमधील बालकांचे आणि गरोदर मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण करण्यात येणारे प्रत्येक बालक व गरोदर माताचे करोना लसीकरणाप्रमाणे यू-वीन प्रणालीवर नोंदणी करण्यात येणार आहे. लसीकरण झालेल्या या लाभार्थ्याला करोनाप्रमाणेच डिजीटल लसीकरण प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.