मुंबई : देशातील सर्वात मोठ्या प्रस्तावित वाढवण बंदराला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तावा ते भरवीर दरम्यान १०४ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गाच्या संरेखन आणि भूसंपादनाला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता भूसंपादनाच्या प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच एमएसआरडीसीकडून भूसंपादनाच्यादृष्टीने ड्रोन सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एक हजार हेक्टर जागेचे संपादन केले जाणार आहे. तर या भूसंपादनासाठी दीड हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

पालघर येथे वाढवण बंदराची उभारणी करण्यात येणार आहे. या बंदराला राज्यातील अधिकाधिक जिल्हे जोडण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तवा जंक्शन ते वरोर, वाढवण अशा ३२ किमी लांबीचा महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) बांधण्यात येणार आहे. तवा जंक्शन ते भरवीर दरम्यानच्या १०४ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाची बांधणी एमएसआरडीसीकडून केली जाणार आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने तवा ते भरवीर महामार्गाचे संरेखन निश्चित करून यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एप्रिलमध्ये मान्यतेसाठी पाठवला होता. या संरेखनानुसार हा महामार्ग १०४ किमी लांबीचा असणार असून यासाठी १४८९९.७२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

तवा ते भरवीर अंतर सुमारे १८३.४८ किमी आहे. मात्र हा महामार्ग तयार होऊन वाहतूक सेवेत दाखल झाल्यास हे अंतर केवळ १०४ किमीवर येणार आहे. ७८ किमीने प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. सध्या तवा ते भरवीर अंतर पार करण्यासाठी चार ते पाच तास लागतात, पण हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास हेच अंतर केवळ दीड तासात पार करता येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सहा पदरी महामार्गात चार आंतरबदल मार्गिका असणार असून यात एक रेल्वे पूल, १४ प्रमुख पूल, सहा लहान पूल आणि ९ बोगद्याचा समावेश असणार आहे. अशा या महामार्गाच्या संरेखनास आणि भूसंपादनास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता एमएसआरडीसीकडून लवकरच जमिनीच्या ड्रोन सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. या सर्वेक्षणानंतर किती गावातून महामार्ग जाणार हे निश्चित होईल. भूसंपादनाबाबतची स्पष्टता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, डहाणू, वाडा, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. त्यानुसार या गावांमधील अंदाजे एक हजार हेक्टर जागा या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी अंदाजे दीड हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भूसंपादन आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया पार पाडत प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी बराच वेळ अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षात हा रस्ता पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. त्यामुळे येत्या काही वर्षातच भरवीर ते तवा अंतर दीड तासात पार करणे शक्य होणार असून पुढे एनएचएआयकडून बांधण्यात येणाऱ्या ३२ किमीच्या रस्त्यामुळे काही मिनिटात वाढवण बंदरावर पोहचता येणार आहे.