Pahalgam Terror Attack Updates Today : पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील वातावरण ढवळून निघाले असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. त्याच वेळी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कटरा येथे संप पुकारण्यात आला आहे. कटऱ्यामधील दुकाने, वैष्णोदेवीच्या दर्शनाला घेऊन जाणारे घोडे मालक, डोलीवालेही संपात सहभागी झाल्यामुळे भाविकांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत.

दरवर्षी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कटरा येथे येतात. वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन पर्यटक पुढे श्रीनगरला जातात किंवा श्रीनगर सफर पूर्ण करून वैष्णोदेवीच्या दर्शनाला येतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आले आहेत. बैसरन येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या अनेकांनी किमान वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन घरी परतण्याचे बेत आखले आणि त्यांनी कटऱ्याची वाट धरली. यामुळे कटऱ्यामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे.

कटऱ्यामध्ये भाविकांचा ओघ वाढलेला असतानाच दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रहिवाशांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे कटऱ्यामधील दुकाने, वाहतूक ठप्प झाली आहे. त्यात तेथे गेलेल्या महाराष्ट्र व मुंबईतील पर्यटकांचे हाल होऊ लागले आहेत.

गर्दीचा रेटा आणि संप

एकीकडे सर्व कारभार ठप्प झालेला असताना कटरा येथे पर्यटकांचा ओघ मात्र वाढत आहे. कटरा येथील बहुतेक हॉटेलमध्ये जागाच उपलब्ध नाहीत. त्यातच घोडेवाले आणि डोलीवाले संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भाविकांना चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. दर्शनाला जाताना वाटेतील दुकाने उघडी असतील की नाही याचीही शाश्वती नाही. त्यामुळे पाणी आणि खाद्यपदार्थ सोबत घेऊन अनेक भाविक चालतच वैष्णोदेवीच्या मंदिराच्या दिशेने निघाले आहेत, असे काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या सारिका दांडेकर – दाभोळकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटक, भाविकांचाच परस्परांना आधार

श्रीनगरमधून मंगळवारी दुपारी निघाल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करीत आम्ही कटऱ्याला पोहोचलो. मात्र सहल आयोजकांच्या सतर्कतेमुळे वेळीच श्रीनगरमधून निघालो. मात्र वाहतूक कोंडी, नाकाबंदीमुळे कटऱ्यात पोहोचण्यासाठी तब्बल २० तास लागले. येथे पोहोचल्यानंतर कटऱ्यात बंद पुकारण्यात आल्याचे समजले. परंतु सहल आयोजकांनी आधीच हॉटेल आरक्षित केल्यामुळे त्रास झाला नाही. मात्र कटरा येथे बंद पुकारल्यामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांना चालतच जावे लागले, अशी खंत सारिका दांडेकर – दाभोळकर यांनी व्यक्त केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कटऱ्यातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. मात्र बहुतांश सर्वच पर्यटक एकमेकांना मदत करत असल्याचे दर्शन येथे घडले. ही जमेची बाजू म्हणावी लागले, असेही त्यांनी सांगितले.