मुंबई: परदेशी गेलेल्या एका कुटुंबीयांच्या घराचे कुलूप तोडून चोरांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार अमर टेकचंदानी घाटकोपरमधील टिळक रोड परिसरात राहतात. टेकचंदानी राहत असलेल्या इमारतीमध्ये त्यांचा मुलगा चिराग पत्नीसह राहतो. महिन्याभरापूर्वी चिराग पत्नीसह कॅनडा येथे गेला आहे. त्यामुळे त्याचे घर बंद होते. दरम्यान, रविवारी रात्री ९ च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी चिरागच्या घराचे कुलूप तोडले आणि कपाटातील रोख रक्कम आणि दागिने असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
अमर टेकचंदानी बाजारातून घरी परतत असताना त्यांच्या समोरूनच हे दोन आरोपी पळून गेले. त्यामुळे त्यांना संशय आला. तातडीने ते वरच्या मजल्यावर गेले असता तिरागच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. याबाबत त्यांनी तत्काळ पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.