आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. दरम्यान काँग्रेसला मात्र राज ठाकरेंना बरोबर घेण्यात अडचणी आहेत. कारण दडपशाही करणाऱ्यांच्या किंवा कायदा हातात घेणाऱ्या लोकांच्या बरोबर आम्ही जाऊ शकत नाही ही आमची भूमिका आहे असं खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंना महाविकास आघाडी बरोबर घेणार नाही हे निश्चित आहे. आज वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शरद पवारांशी आमची सकारात्मक चर्चा-वर्षा गायकवाड

शरद पवार यांच्याशी आज आमची साधकबाधक चर्चा झाली. मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकांच्या संदर्भात चर्चा. मुंबई महापालिका निवडणुकींसाठी आमची शरद पवार यांच्यासह आमची आघाडी आहे. आमची या वेळीही ही इच्छा आहे की आपण एकत्र लढलं पाहिजे. पुढील आठवड्यात आम्ही याबाबत चर्चा करणार आहोत. आमची नैसर्गिक आघाडी आहोत. आम्ही संविधानाचा धागा आणि लोकशाही मानणारे आहोत. मुंबईच्या विषयांवर निवडणूक झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंबाबतही भाष्य केलं.

राज ठाकरेंबाबत काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

“संजय राऊत यांनी दोन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकटे लढू शकतो. ही भूमिका त्यांनी मांडली होती. ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छाच देतो. पण याआधी आमची चर्चा व्हायला हवी होती. जेव्हा जेव्हा आम्ही आघाडी केली तेव्हा किमान समान कार्यक्रम हा आमच्यात होताच. इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल आम्ही संविधानाचा धागा पकडून चालणारे लोक आहोत. आगमी काळातील मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी सह जाऊ. मुंबईच्या विकासात सगळ्यांचं योगदान आहे. त्यामुळे दडपशाही करणाऱ्यांच्या किंवा कायदा हातात घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही ही आमची भूमिका आहे.”

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून लोकांना जोडण्याचं काम केलं-वर्षा गायकवाड

आमचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून लोकांना जोडण्याचं काम केलं, प्रेम देण्याचं काम केलं. मुंबईची निवडणूक मुंबईच्या विषयावरच झाली पाहिजे. प्रांत, भाषा, धर्म, जात या वादांमध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास हा मुंबईच्या निवडणुकीचा अजेंडा हवा. मुंबईत अनेक समस्या आहेत. घनकचरा, शिक्षण, आरोग्य, पाणी या विषयांवर बोललं पाहिजे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत आम्ही बोलणार आहोत. आगामी काळात मुंबईकरांचा आवाज म्हणून ही निवडणूक लढणार आहोत असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.