किनाऱ्याची सुरक्षितता की जीवसृष्टीचा ऱ्हास?

इंद्रायणी नार्वेकर, नमिता धुरी

मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समुद्रकिनारा मार्ग प्रकल्पासाठी काढून टाकलेले सिमेंट काँक्रीटचे टेट्रापॉड गेल्या काही दिवसांपासून वांद्रे आणि वर्सोवा येथील समुद्रकिनाऱ्यांवर टाकले जात आहेत. मात्र अनेक वर्षांपासून असलेल्या या किनाऱ्यांवर अचानक मरिन ड्राइव्हप्रमाणे टेट्रापॉड का टाकले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या सिमेंट काँक्रीटच्या खडकांमुळे निसर्गाची हानी होईल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे तर किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी हे खडक फायद्याचे आहेत असे सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे.

वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे गेल्या काही दिवसांपासून त्रिकोणी आकाराचे सिमेंट काँक्रीटचे टेट्रापॉड टाकले जात आहेत. वांद्रे समुद्रकिनारी आतापर्यंत लाटांना कोणताही अडथळा नव्हता. पदपथाच्या पायऱ्यांपर्यंत या लाटा वहात येत होत्या. हा समुद्रकिनारा मेरिटाइम बोर्डाच्या अखत्यारित येतो. तीन वर्षांपूर्वी या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र लाटांच्या माऱ्यामुळे या पायऱ्यांची दुरुस्ती दरवर्षी करावी लागते. हा खर्च वाचवण्यासाठी मेरिटाइम बोर्डाने हे खडक आणून टाकल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्ते झोरू बथेना यांनी के ला आहे. मात्र हे खडक टाकल्यामुळे समुद्री पदपथाची सुरक्षितता होणार असून या खडकांच्या खोबणीत जीवसुष्टीही सुरक्षित राहील, असा दावा मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी के ला आहे. सागरीकिनारा मार्गाअंतर्गत हाजी अली येथून काढलेले हे टेट्रापॉड आम्ही वापरले असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, समुद्रकिनारा प्रकल्पासाठी आतापर्यंत साधारणत: चार किलोमीटरच्या पट्टय़ातील सिमेंट काँक्रीटचे टेट्रापॉड हटवण्यात आले आहेत.

या प्रकल्पांतर्गत नैसर्गिक खडकांची संरक्षक भिंत बांधली आहे व त्याकरिता हे टेट्रापॉड काढून टाकण्यात आले आहेत, अशी माहिती समुद्रकिनारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्यानंतर ते कु ठे टाकण्यात आले याबाबतची माहिती आपल्याला नसून हा मेरिटाइम बोर्डाचा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सागरीकिनारा मार्गासाठी अनेक ठिकाणी भराव टाकण्यात आला आहे. ज्या ठिकाणी भराव घातला आहे तेथील पाणी आता अन्य ठिकाणी शिरेल. त्यामुळे भरतीची तीव्रता वाढेल व वाळू वाहून जाईल. म्हणूनच भरतीची तीव्रता थोपवण्यासाठी हे दगड टाकले जात आहेत’, असे वनशक्तीचे दयानंद स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. चौपाटीच्या वाळूमध्ये लहान मुले खेळतात, वृद्ध फे रफटका मारतात, ताजी हवा अनुभवण्यासाठी नागरिक येथे येतात. अशा या वर्सोवा चौपाटीवर दगड टाकले तर पर्यावरणीय समस्या उद्भवतील. समुद्राचे पाणी बाहेर येईल, अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

पर्यावरणवाद्यांच्या तक्रारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वर्सोवा समुद्रकिनारी लाटांमुळे शेजारच्या इमारतीची भिंत तुटत असल्याचे कारण देत काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी किनाऱ्याजवळ कठडा बांधण्याचा प्रस्ताव ‘सार्वजनिक बांधकाम विभागा’कडे दिला होता. विभागाने हा प्रस्ताव ‘महाराष्ट्र सागरीकिनारा व्यवस्थापन प्राधिकरणा’समोर (कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे ) ठेवला. प्राधिकरणाने हा प्रस्ताव फेटाळला व ‘भिंत तुटत असेल तर दुरुस्त करा आणि तिची जाडी वाढवा, अशी सूचना केली. मात्र त्यानंतर किनाऱ्याच्या मधोमध एक भिंत बांधण्यात आली. बाहेरच्या बाजूला एक कठडा बांधला. आता दुसऱ्या बाजूला दगड टाकले जात आहेत, असा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांनी के ला आहे. टाळेबंदीचा फायदा घेत टेट्रापॉड टाकण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत पर्यावरण कार्यकर्त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत.