मुंबई : पूर्णवेळ पर्यावरण रक्षणासाठी झोकून देणाऱ्या ज्येष्ठ निसर्ग, पर्यावरण, प्राणी अभ्यासक डॉ. जेन गुडाल यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. जेन गुडल इन्स्टिट्यूटने बुधवारी (१ ऑक्टोबर) त्यांच्या निधनाची माहिती दिली. अमेरिकेतील व्याख्यान मालिकेसाठी गुडाल कॅलिफोर्नियात होत्या.

चिम्पांझींवरच्या विविधांगी संशोधनावर डॉ. गुडाल यांनी केंब्रिजमधून ‘पीएच.डी.’ मिळवली होती. डॉ. गुडाल या ज्येष्ठ वन्यजीव संशोधिका असून ‘प्रायमेट’ या वानर कुळातील प्राण्यांवर केलेल्या अभ्यासासाठी प्रसिद्ध आहेत. आफ्रिकेत चिम्पांझीविषयी केलेल्या संवर्धन आणि संशोधन कार्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. संयुक्त राष्ट्र परिषदेने २००२मध्ये त्यांच्या नावाची घोषणा शांतीदूत म्हणून केली. त्यांच्या या बहुविध कार्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा ‘टेम्पलटन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टेम्पलटन पुरस्कार विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या वैज्ञानिकांना दिला जातो. डॉ. गुडाल यांचा जन्म १९३४ मध्ये लंडन येथे झाला, नंतर त्या १९५७ मध्ये केनियाला गेल्या, तेथे त्यांना प्राणिसृष्टीची प्राथमिक ओळख झाली. मानववंशशास्त्रज्ञ व जीवाश्मशास्त्रज्ञ लुई लिकी यांच्या निमंत्रणावरून त्यांनी १९६० मध्ये चिम्पांझीवर संशोधन सुरू केले.

डॉ. जेन गुडाल यांनी चिम्पान्झींच्या संरक्षण व अभ्यासासाठी १९७७ मध्ये ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. निसर्ग व मानव यांच्यातील एक दुवा म्हणून काम करताना त्यांनी ६५ देशात पर्यावरण प्रकल्प राबवले आहेत. चिम्पांझींच्या वर्तनशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास करणे हा मूळ उद्देश. या अभ्यासावर डॉ. गुडाल यांनी काही प्रबंध लिहिले, त्यातील निष्कर्षांनी प्राणी अभ्यासक अवाक झाले. गोम्बेतल्या चिम्पांझीवर डॉ. गुडाल संशोधन करीत होत्या. सर्वच माकडे शाकाहारी नाहीत, असा निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आला होता. त्यांनी चिम्पांझींच्या टोळ्यांचे युद्ध पाहिले. टोळीवर सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांचे लचके तोडणारे चिम्पांझी त्यांनी पाहिले.

मुंबई दौरा

‘जेन गुडाल इन्स्टीट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत डॉ. गुडाल गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन वन कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला होता.