मुंबई : पत्रकारिता, मराठी-इंग्रजी अनुवाद, चित्रपट-कला समीक्षा, कादंबरीलेखन, मराठीसह इंग्रजीतील स्वतंत्र लेखणीही तेवढ्याच ताकदीने रसिक वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांना आज ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. हा सन्मान सोहळा आज मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी दादर येथील ‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात सायंकाळी ६.१५ वाजता साजरा होणार आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर प्रमुख पाहुण्या म्हणून या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या वेळी ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५’ साठी निवड करण्यात आलेल्या नऊ दुर्गांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
स्त्री कलाकारांचे वाद्यवृंदीय सादरीकरण
या सन्मान सोहळ्यावेळी स्त्री कलाकारांचे वाद्यावृंदीय सादरीकरण हे खास आकर्षण आहे. या कार्यक्रमात भावना अंकुश, अमृता ठाकूरदेसाई, फेणी भावसार, राधिका अंतुरकर, प्रेषिता मोरे, विनिता जाधव, सुलक्षणा फाटक, शलाका देशपांडे, कौशिकी जोगळेकर या कलाकारांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता पेंडसे आणि कुणाल रेगे करणार असून संयोजन ‘आर्च एंटरप्राइजेस’ यांचे आहे.
पुरस्कार सन्मान सोहळा सर्वांसाठी खुला असणार आहे. एका व्यक्तीस एकच प्रवेशिका दिली जाणार असून नाट्यगृहात कार्यक्रमापूर्वी अर्धा तास आधी वितरित केल्या जातील. कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळेल. काही जागा राखीव असतील.