राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे केंद्राला अंतिम इशारा देणार

उमाकांत देशपांडे, मुंबई</strong>

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेवर रविवारी टीकास्त्र सोडले असले, तरी आता हे मतभेद मिटले आहेत. शिवसेनेला परिषदेने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतंत्र रॅली घेण्याचे जाहीर केले असले तरी शिवसेनेची सभा होईलच, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

अयोध्येत राममंदिराची उभारणी लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करावी, अन्यथा ते काम आम्ही सुरू करू, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेतर्फे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दिला जाणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यासाठी अयोध्येत २५ नोव्हेंबरला सभा घेणार आहेत. ते २४ नोव्हेंबरला अयोध्येला पोचणार असून सायंकाळी शरयूतीरी आरती करतील. राम मंदिरात दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन ते राममंदिर न्यासाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि संतमहंतांशी चर्चा करतील. त्यानंतर उत्तर प्रदेशात प्रथमच होणाऱ्या जाहीर सभेला संबोधित करतील, अशी माहिती शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने दिली.

राम मंदिर उभारणीसाठी विलंब झाला असून केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश जारी करून वादग्रस्त जागा मंदिर न्यासाच्या हवाली करावी, अन्यथा शिवसेना हिंदूुत्ववादी संघटनांबरोबर शिलान्यास करुन मंदिर उभारणीसाठी पावले टाकील, असा इशारा या सभेत ठाकरेंकडून दिला जाईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले.  शिवसेनेने सभेच्या निमित्ताने अयोध्येत शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली असून पक्षाचे सर्व आमदार-खासदार व मंत्री सभेसाठी उपस्थित राहतील. शिवसेनेच्या शाखा व अन्य कार्यालयांमध्ये अयोध्येला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंदणी सुरू असून २४-२५ नोव्हेंबर रोजी राज्यातही राम मंदिरासाठी जनजागरणाद्वारे वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे.

हिंदीत भाषण

परप्रांतीयांवर, विशेषत: उत्तर प्रदेश व बिहारींवर हल्लाबोल करणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात प्रथमच जाहीर सभेत हिंदूीतून भाषण करतील.