Vice Presidential Election 2025 Updates मुंबई: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या खासदारांन पत्र पाठवून पाठिंबा मागणार असल्याचे ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शुक्रवारी सांगितले.

मुंबईत भेटी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आपल्या खासदारांशी संवाद साधला असून उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे अन्य पक्षातील खासदारांनीही पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे न्यायमूर्ती रेड्डी यांनी सांगितले.

शरद पवार व उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी अत्यंत सकारात्मकरीत्या पाठिंबा दिला असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद अत्यंत महत्त्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंडिया आघाडीने मला उमेदवारी दिली असून मला पाठिंबा मिळावा यासाठी मी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना वैयक्तीक पत्र पाठवून विनंती करणार आहे. भाजपाच्या खासदारांनी वेळ दिली तर त्यांनाही भेटेन असे रेड्डी यांनी सांगितले. या निवडणुकीत पक्षादेश नसतो, गुप्त मतदान असते, त्यामुळे माझी उमेदवारी योग्य वाटत असेल तर मला मतदान करावे, अशी सर्वपक्षीय खासदारांनी विनंती करणार असल्यचाचे रेडी यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यत्र हर्षवर्धन सपकाळ यांनी देशातील राजकीय परिस्थिती पाहता निवडणुकीचा निकाल चमत्कारिक असू शकतो असे भाकीत वर्तवले इंडिया आघाडीकडे बहुमत नसले तरी निवडणुकीत इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, असा विश्वास खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी कोल्हापूरचे खासदार श्री. छत्रपती शाहू महाराज, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, राज्यसभा खासदार डॅा. नासिर हुसेन, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.