मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचे आव्हान; १९ ते २१ ऑक्टोबपर्यंत राज्यात तैनात होणार

मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय रेल्वेतील गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या लोहमार्ग पोलिसांना लोकसभेनंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीतील सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी ३,५०० पैकी २,२०० लोहमार्ग पोलीस राज्यातील वेगवेगळ्या भागांत १९ ऑक्टोबरपासून तैनात केले जाणार आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ १३०० पोलिसांना सांभाळावी लागणार आहे.

मध्य रेल्वेचा उपनगरीय अवाका सीएसएमटी ते कल्याण, खोपोली, कसारा आणि पनवेल व गोरेगावपर्यंत तर पश्चिम रेल्वेचा चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. मध्य रेल्वेवरुन दिवसाला ४४ लाख आणि पश्चिम रेल्वेवरुन ३५ लाख उपनगरीय प्रवास करतात. हा प्रवास करताना रेल्वे स्थानक व हद्दीत लोहमार्ग पोलिसांबरोबरच रेल्वे सुरक्षा दलही तैनात असतात. यात लोहमार्ग पोलिसांकडून स्थानकातील गुन्ह्यंचा शोध लावला जातो, तर रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेची व काही प्रमाणात गुन्ह्यंचा शोध लावण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडेही असते. परंतु यात लोहमार्ग पोलीसांची जबाबदारी ही अधिकच असते.  प्रवासी संख्या जास्त आणि मनुष्यबळ कमी असतानाच त्यांनाही निवडणुकीच्या कामांसाठीही जुंपले जाते.

राज्यात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलिस दलातील ३,५०० पैकी २ हजार २०० पोलिसांना राज्यात सुरक्षेसाठी पाठवले जाणार आहे. त्यामुळे ७५ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केवळ १,३०० पोलिसांवर असेल. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबपर्यंत २,२०० लोहमार्ग पोलीस मुंबईतील रेल्वे स्थानकांवर नसतील. त्यांना अकोला, बुलढाणा, जळगाव, सातारासह अन्य भांगात सुरक्षेसाठी तैनात केले जाईल.  त्यामुळे उर्वरित पोलिसांवर सुरक्षेचा मोठा भार पडणार आहे. अधिक भार पडू नये यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात तैनातीसाठी बाहेरचीही जबाबदारी देण्याचा विचार होत आहे.

मुंबई उपनगरीय मार्गावर मोबाईल चोरी, पाकिट चोरीसह  विनयभंग, मारहाण, दरोडा इत्यादी गुन्हे होत असतात. ऑक्टोबर महिन्यातील गुन्हे :

तारीख                      गुन्हे

१ ऑक्टोबर             १०५

२ ऑक्टोबर             १०१

३ ऑक्टोबर             ९४

४ ऑक्टोबर             १११

५ ऑक्टोबर             १०३

६ ऑक्टोबर             ७६

७ ऑक्टोबर             ५८

८ ऑक्टोबर             ९३

९ ऑक्टोबर             ७४

१० ऑक्टोबर           १०६

११ ऑक्टोबर           १११

१२ ऑक्टोबर           १०४

१३ ऑक्टोबर           ८५

विधानसभा निवडणुकीच्या कामाची जबाबदारी काही लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली असली, तरीही मुंबई रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही सक्षम आहोत. त्यासाठी नियोजन केले आहे.-रवींद्र सेनगावकर, आयुक्त, लोहमार्ग पोलीस