पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या समारोप समारंभाला महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निमंत्रित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाचे भाजपमध्ये अनेकांना वेध लागल्याच्या पाश्र्वभूमीवर दिल्लीतील भाजप नेत्यांशी उत्तम संबंध असणाऱ्या विद्यासागर राव यांनाही दिल्ली खुणावू लागल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिरुपती येथे गेल्या आठवडय़ात भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते. समारोप समारंभाला विज्ञानाशी फारसा काही संबंध नसणारे किंवा पेशाने वकील असणाऱ्या विद्यासागर राव यांना निमंत्रित करण्यात आले होते. विद्यासागर राव हे करीमनगरचे असून, हा जिल्हा आता नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणा राज्यात आहे. म्हणजेच विद्यासागर राव यांचा आता तसा आंध्रशी संबंध नाही.  विज्ञान परिषदेच्या समारोप समारंभाला विद्यासागर राव हे उपस्थित राहिल्याने साहजिकच दिल्लीत कुजबूज सुरू झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पुढाकाराने विद्यासागर राव यांना निमंत्रित करण्यात आल्याचे समजते. २००२ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी चर्चा होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अलेक्झांडर यांच्या नावाला अनुकूल होते. पण आंध्रचे तेव्हाही मुख्यमंत्री असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी अलेक्झांडर यांच्या नावाला विरोध केला होता. पर्याय म्हणून ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव पुढे आले आणि ते सर्वमान्य झाले होते. १७ खासदार असलेल्या चंद्राबाबूंचे आता तेव्हासारखे राजकीय वजन नसले तरी उपराष्ट्रपतीपदाकरिता आंध्र किंवा तेलगू नेत्याच्या नावाचा त्यांच्याकडून आग्रह धरला जाऊ शकतो.

माजी मुख्यमंत्री जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर सारीच व्यवस्था कोलमडली होती. विद्यासागर राव यांनी चेन्नई गाठून अण्णा द्रमुकच्या मंत्र्यांशी चर्चा केली व जयललितांकडील खाती विद्यमान मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्याकडे सोपवून प्रशासनाची गाडी रुळावर आणली होती. अलीकडेच पनीरसेल्वम यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असता विद्यासागर राव यांची पूर्णवेळ तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली. अर्थात, मुंबई सोडून चेन्नईला जाण्यास विद्यासागर राव यांची तयारी नाही. पण आगामी जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विचार व्हावा, असा त्यांचा प्रयत्न आहे.

प्रदीर्घ राजकीय अनुभव

  • सी. विद्यासागर राव हे जनसंघाचे जुने कार्यकर्ते आहेत. तीनदा आंध्र विधानसभेत भाजपचे गटनेतेपद त्यांनी भूषविले आहे. १९९८ आणि १९९९ मध्ये ते करीमनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.
  • वाजपेयी सरकारमध्ये गृह आणि वाणिज्य खात्यांचे राज्यमंत्रिपद त्यांनी भूषविले आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे राज्यपालपद त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
  • रौशय्या यांची तामिळनाडू राज्यपालपदाची मुदत संपुष्टात आल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडेच तामिळनाडू राज्याचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidyasagar rao
First published on: 14-01-2017 at 01:28 IST