मुंबई – विक्रोळी येथील बुध्द विहारातून भगवान गौतम बुध्दांची पुरातन मूर्ती चोरणार्यांना विक्रोळी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून पोलिसांनी दोन आरोपींना वांद्रे परिसरातून अटक केली.

विक्रोळी कन्नमवार नगर येथे बुध्दविहार आहे. या बुध्दविहारात जपानी बनावटीची पुरातन बुध्द मूर्ती होती. त्या मूर्तीचे वजन सुमारे १३ किलो आहे. बुध्दविहारातील पंचधातूच्या मूर्तीची १३ नोव्हेंबर रोजी चोरी झाली होती. चोरीच्या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला होता. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध

चोरीच्या तपासासाठी विक्रोळी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसराचे सीसीटीव्ही तपासले. एक संशयित इसम पाठीवर पांढर्या रंगाची जड पिशवी घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी मग सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या आधारे माग काढायला सुरवात केली. त्याने विक्रोळी स्थानकातून शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाकडे जाणारी ट्रेन पकडली.

पोलिसांनी विक्रोळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे चित्रिकरण तपासले. त्यावेळी संशयित इसम दादरला उतरला. तेथून ट्रेन बदलून तो पश्चिम रेल्वेच्या माहिम स्थानकात उतरला.

पोलिसांनी मग माहिम स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. तो माहिम पूर्वेच्या दिशेन जात असल्याचे दिसले. पोलिसांच्या पथकाने माहिम रेल्वेस्थानकाच्या पूर्वेचा परिसर पिंजून काढून तेथील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी संशयित इसम एका भंगारच्या दुकानात मूर्ती घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी पुढील तपास केला असता संशयित आरोपीला वांद्रे परिसरात रहात असल्याचे दिसले. पोलिसांच्या पथकाने वांद्रे खार परिसरात सापळा लावून जितेंद्र बिनकर (४६) आणि त्याचा साथीदार मार्टीन कन्नन (४६) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली भगवान गौतम बुध्दांची मूर्ती ताब्यात घेण्यात आली आहे.

पथकाने केली कारवाई

ही कारवाई विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत नाईकवाडी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदेश मोरे, पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश चिंचळे आदींच्या पथकाने केली.