मुंबईः मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले असताना आता विलेपार्ले येथील टिळक विद्यालायाला धमकीचा ई-मेल आला आहे. शाळा आरडीएक्सने उडविण्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली होती. याबाबतचे वृत्त समजताच सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. शोधसत्र राबविण्यात आले. मात्र शाळेत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी गोवंडी आणि कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोट घडवून आण्याचे ई-मेल प्राप्त झाले होते.शाळेच्या ई-मेल आयडीवर बुधवारीा पहाटे ४.३० च्या सुमारास हा ईमेल प्राप्त झाला होता. हा प्रकार शाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्य सुरक्षा अधिकारी संजय तोणपी यांनी स्वतः मुबंई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून धमकीच्या ई-मेलची माहिती दिली. आरोपीने शाळा आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी ई-मेलमध्ये दिली होती. याबाबत माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने शाळेची तपासणी केली. मात्र तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

खोडसाळपणाने हा ई-मेल करण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी मुबंई पोलीस अधिक तपास करीत आहेत. नाखिरान डॉट गोपाळ या ई-मेल आयडीवरून हा ई-मेल प्राप्त झाला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही मुंबई व परिसरातील अनेक शाळांना अशाप्रकारे धमकीचे ई-मेल आले आहेत. पालक व विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन यापूर्वीच पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कांदिवलीतील आंतरराष्ट्रीय शाळेला धमकी

गेल्या आठवड्यात कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर कॉम्प्लेक्स येथील रायन आंतरराष्ट्रीय शाळेत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा ई-मेल प्राप्त झाला होता. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात धमकी देऊन भीती निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धमकीमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. आरोपीने त्यासाठी दिवीज प्रभाकर लक्ष्मी नावाच्या ई-मेल आयडी तयार केला होता. तो ई-मेल आयडी वापरणाऱ्या व्यक्तीचा तंत्रज्ञानाच्या मदतीन पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणामागे खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोवंडीतील आंतरराष्ट्रीय शाळेला धमकी

कांदिवलीपाठोपाठ गेल्या आठवड्यात गोवंडी येथील कनकिया आंतरराष्ट्रीय शाळेलाही बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यातही दिवीज प्रभाकर लक्ष्मी नावाच्या व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय आहे. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक शांतता भंग करून भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी खोटी धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांची गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे. गोवंडी व कांदिवली येथील ई-मेल एकाच ई-मेल आयडीवरून पाठवण्यात आले आहेत.