भाजपा नेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वात एक सर्व्हेक्षण झालं आणि त्यांनी दिलेल्या अहवालानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद घटेल, असा दावा करण्यात आला. त्यावरून जोरदार चर्चाही रंगली. आता स्वतः विनोद तावडे यांनीच या कथित तावडे अहवालावर आणि त्यातील दाव्यावर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
विनोद तावडे म्हणाले, “दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे.”
हेही वाचा : अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या बातम्या पसरवण्यात संजय राऊतांची भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी तावडे अहवालाबाबत विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “भाजपात अशी कोणतीही तावडे समिती तयार झालीच नाही. समितीच नव्हती, त्यामुळे असा कोणताही अहवालच तयार झाला नाही. कुणीतरी आपल्याच मनाने कपोलकल्पित बातम्या तयार केल्या आणि जाणीवपूर्वक या बातम्या चालवल्या. भाजपा मागे पडला आहे असं चित्र निर्माण करण्यासाठी ही बातमी होती.”