अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ प्राचार्य व कर्मचारी तसेच प्राध्यापक यांच्या नियुक्त्या त्वरित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महाविद्यालयामधील पायाभुत सुविधा, शैक्षणिक बाबी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने सुधारणा करणे इत्यादी सर्व बाबींसाठी सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक ऑडिट करून घेण्याचे आदेश राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी शिक्षण खात्याला दिले.
राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक सह्याद्री अतिथीगृहात विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरु तसेच बोर्ड ऑफ कॉलेज अॅण्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे संचालक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचा दर्जा जागतिक विद्यापीठाच्या यादीमध्ये उंचविण्यासाठी संशोधनावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शैक्षणिक नियोजन आणि त्रैमासिक आढावा योग्य पद्धतीने व कालबध्द स्वरुपात व्हायला पाहिजे, या दृष्टीने आगामी काळात उपाययोजना करण्याचा निर्धार तावडे यांनी व्यक्त केला.
विद्यापीठीय राजकारणामध्ये विविध प्राध्यापक व विद्यार्थी संघटना यांच्याकडून विद्यापीठांच्या कुलगुरूंवर येणारे दबाव, राजकीय हस्तक्षेप यापासून कुलगुरूंना व विद्यापीठांना मुक्त ठेवण्याची हमी तावडे यांनी दिली. शैक्षणिक दृष्ट्या विद्यापीठांचा दर्जा अधिक उंचविण्यासाठी विद्यापीठांमधील गटातटाचे राजकारण तसेच विविध तंटे यांपासून दूर राहायला पाहिजे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी भूमिका तावडे यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod tawde orders educational audit of colleges
First published on: 23-02-2015 at 05:20 IST