राज्यात करोनाचं थैमान पुन्हा एकदा सुरू झालेलं असताना दुसरीकडे कोविड रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांमुळे रुग्ण पुरते हवालदील झाल्याचं चित्र दिसत आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचां प्राम गमवावे लागल्यानंतर आता विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये १३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर आता राज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विरार येथील कोविड हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यात झालेले दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एकीकडे कोविडचं प्रचंड भय लोकांच्या मनात आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या घटनांनी अधिक भर पडते आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझी सरकारला विनंती आहे की…

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “प्रत्येक घटनेनंतर मुख्यमंत्री आणि प्रशासन आम्ही याची चौकशी करू असं सांगतात. आणि दरवेळी सांगितलं जातं की हॉस्पिटलचं फायर ऑडिट करू, पण असं ऑडिट होताना कुठेच दिसत नाही. कोविड काळात हॉस्पिटल्सवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत काहीतरी व्यवस्था उभी केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, यासाठीचे चेक्स हॉस्पिटल्समध्ये कसे करता येतील हे पाहिलं पाहिजे. गरज असेल, तर सरकारने हॉस्पिटल्सला मदत केली पाहिजे. भंडारा, इशान्य मुंबई, नाशिक, विरार या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत. मृत्यूमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. तिथल्या रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि या घटनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा अशा घटना होणार नाहीत, याकरता काही प्रभावी पावलं सरकारच्या वतीने उचलली गेली पाहिजेत अशी माझी सरकारला विनंती आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

घटनेनंतर प्रतिक्रिया येतात, पण पुढे?

सरकारने अशा घटनांचा गांभीर्याने विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली आहे. “या घटनांचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. भंडारा, नागपूर, नाशिक, विरार या प्रत्येक घटनेनंतर आपण प्रतिक्रिया देतो. पण अशा घटना होऊ नयेत, याकरता हवं तेवढं लक्ष आपलं नाही. अशा घटनांमुळे कोविडविरोधातली लढाई अजून अडचणीची होते. सरकारच्या सर्व विभागांनी एक कार्यक्रम हातात घेऊन पुढच्या महिन्याभरात राज्यातल्या सर्व हॉस्पिटल्सचं सेफ्टी ऑडिट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

वाचा सविस्तर – विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ करोना रुग्णांचा मृत्यू

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला मध्यरात्री उशीरा आग लागल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हा अतिदक्षता विभाग होता. आग लागली तेव्हा अतिदक्षता विभागात १७ रुग्ण होते. यापैकी १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virar hospital fire vijay vallabh bjp devendra fadnavis slams maharashtra government pmw
First published on: 23-04-2021 at 11:13 IST